बाबा राम रहिम बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणांमध्ये दोषी -
हरयाणातील पंचकुलामध्ये आज डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम यांना बलात्कार आणि लैंगिक शोषण या दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरविण्यात आले आहे. सीबीआय न्यायालयाने बाबा राम रहिम यांना दोषी ठरविल्यानंतर पंचकुलामध्ये हिंसाचार उसळला आहे. या हिंसाचारात ३० जण ठार झाले आहेत तर २५० हून जास्त लोक जखमी झाले आहेत.
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम यांची सुनावणी हरयाणातील पंचकुलामध्ये होती. या सुनावणीत बाबा राम रहिम यांना दोषी मानण्यात आले आहे. सीबीआय कोर्टाने हा निर्णय देताच डेरा सच्चा सौदाच्या आधीपासूनच पंचकुलामध्ये तळ ठोकून बसलेल्या हजारो समर्थकांनी हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटना सुरू केल्या. दिल्ली, पंजाब, हरयाणा या ठिकाणी डेरा सच्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी तोडफोड आणि जाळपोळ सुरू केली आहे. या अनुयायांनी शांतता बाळगावी असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले आहे. ट्विटच्या माध्यमातून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हे आवाहन केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही डेरा सच्चाच्या अनुयायांना शांततेचे आवाहन केले आहे. दरम्यान रॅम रहीम यांच्या शिक्षेची सुनावणी सुनावणी सोमवारी २८ ऑगस्टला होणार आहे.