मुंबई | प्रतिनिधी -
गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्याच्या दृष्टीने प्रसादावर एफडीएकडून करडी नजर ठेवली आहे. यावेळी अन्न सुरक्षा, स्वच्छतेच्या दृष्टीनेही काळजी घेण्यात येणार असल्याची माहिती एफडीए आयुक्त पल्लवी दराडे यांनी दिली.गणेशोत्सव मंडळातील प्रसादवाटप हा धार्मिक आणि संवेदनशील मुद्दा असल्याने एफडीएने आतापर्यंत विनानोंदणी वा विनापरवाना प्रसाद वाटप करणाऱ्या मंडळांविरोधात कारवाई केलेली नाही वा यापुढेही कारवाई करण्यात येण्याची शक्यता नाही. मात्र यावेळी गणेशोत्सव मंडळाकडून प्रसादाचे वाटप अन्न सुरक्षा कायद्याचे पालन करता यावे यादृष्टीने एफडीएकडून विशेष लक्ष दिले जात आहे. त्यानुसार दरवर्षी एफडीए मंडळांना नोंदणी आणि परवान्यासाठी पुढे येण्यास आवाहन करते. गणेशोत्सव काळात बाप्पाच्या प्रसादवाटपावरही एफडीएने लक्ष ठेवले आहे. याकरिता गणेश मंडळांची कार्यशाळा घेवून उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सूचना केल्याचे एफडीए आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी सांगितले. तसेच अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, त्यांनी दिलेल्या सुचनांचे योग्य ते पालन करणे अनिवार्य आहे. अन्न, प्रसाद याबाबत काही संशय असल्यास आपल्या क्षेत्रातील अऩ्न सुरक्षा अधिकारी वा सहायक आयुक्ताशी त्वरीत संपर्क साधावा.
हेल्पलाईन क्रमांक - 1800222365
मंडळांनी अशी घ्यावी काळजी -
प्रसाद तयार करताना जागा स्वच्छ आणि आरोग्यदायी असावी. प्रसादासाठी लागणारा कच्चा माल, अन्नपदार्थ परवानाधारक, नोंदणीकृत अन्न विक्रेते वा व्यावसायिकांकडून खरेदी करावा. फळांचा प्रसाद म्हणून वापर करताना फळांची खरेदी ओळखीच्या, परवानाधारक, नोंदणीकृत फळविक्रेत्याकडून करावी. कच्चे, सडलेली किंवा खराब फळांचा वापर करू नये. प्रसादाचे उत्पादन करताना मानवी सेवनास अपायकारक ठरणार नाही याची खात्री करावी. प्रसाद उत्पादन करणाऱ्या स्वयंसेवकास ग्लोव्हज, टोपी इत्यादी बंधनकारक. स्वयंसेवक हा कुठल्याही संसर्गजन्य रोगी नसावा. दूध-दुग्धजन्य पदार्थ, खवा- माव्याची वाहतुक आणि साठवणूक थंड रेफ्रीजरेटेड वाहनातून करावी. साठवलेला खवा-मावा प्रसादासाठी वापरू नये.