बेस्टला लवकरच दिलासा मिळणार
मुंबई । प्रतिनिधी -
बेस्ट आर्थिक संकटात असल्याने पालिकेने बेस्टला कर्ज दिले होते. या कर्जाच्या वसुलीसाठी खाजगी बँकेत ‘इस्क्रो’ अकाऊंट सुरु करण्यात आले. मात्र या अकाउंटमध्ये बेस्टचे पैसे पडून राहू लागल्याने कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देण्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या. महिन्याच्या सुरुवातीला या अकाउंटमधील पैसे बेस्टला वापरता आल्यास कर्मचाऱ्यांना पगार देणे सोयीस्कर असल्याने करारामधील अटीत सुधारणा करण्याची मागणी बेस्टने केली होती. त्याला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. आता हा प्रस्ताव पालिकेच्या महासभेत मंजूर झाल्यावर बेस्टची जाचक अटींमधून सुटका होईल.
महापालिकेने ‘बेस्ट’ला जानेवारी २०१३ मध्ये १६०० कोटींचे कर्ज दिले आहे. यावेळी महापालिका प्रशासन आणि ‘बेस्ट’ यांच्यात झालेल्या करारानुसार कर्जाची मुद्दल आणि व्याज महिन्याच्या पहिल्या तारखेला ‘बेस्ट’च्या उत्पन्नातून थेट आयसीआयसीआय बँकेत उघडलेल्या ‘इस्क्रो’ अकाऊंटमध्ये जमा होते. यामध्ये बेस्टला मिळणारे सर्व उत्पन्न महिन्याच्या एक तारखेला जमा होते. मात्र हे ४०.५८ कोटी आयसीआयसीआय बँक पुढील २६ ते २७ दिवस स्वत:कडे गोठवून ठेवत होती. इतकी मोठी रक्कम आयसीआयसीआय बँकेकडे जमा राहिल्यामुळे त्याचा फायदा त्या बँकेला होत होता. बेस्ट आपलीच जमा रक्कम वापरता येत नव्हती.
आर्थिक संकटात असलेल्या बेस्टला कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर करण्यास अडचणी येऊ लागल्या. ‘बेस्ट’ आर्थिक डबघाईला आली असताना ‘बेस्ट’ला सहकार्य व्हावे म्हणून ‘बेस्ट’ समितीने ही रक्कम २० तारखेनंतर जमा करण्यासाठी कराराच्या अटी शिथील कराव्यात असा प्रस्ताव मंजूर करून पालिका प्रशासनाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला पालिकेच्या स्थायी समितीने बहुमताने मंजुरी दिल्याचे अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी जाहिर केले. ‘इस्क्रो’ अकाऊंटच्या जाचक अटी बदलण्यास स्थायी समितीत मंजुरी मिळाल्यामुळे ४०.५८ कोटींची रक्कम ‘बेस्ट’ प्रशासनाला २० तारखेपर्यंत दैनंदिन व्यवहारास वापरण्यासाठी मिळणार आहे. ही रक्कम कर्मचार्यांचे पगार देण्यासाठी उपयोगी पडणार असल्यामुळे कर्मचार्यांचे पगार वेळेत देता येणार आहे.