मुंबई / प्रतिनिधी - मुंबईत दहीहंडी फोडण्यासाठी उंच थर रचण्याच्या नादात सुमारे २०२ गोविंदा जखमी झाले आहेत. या सर्व गोविंदांना सरकारी व पालिकेच्या विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी १८७ गोविंदांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर १५ गोविंदाना जबर मार लागल्याने त्यांच्यावर अद्यापही विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दहीहंडीसाठी उंच थर लावण्यावर मर्यादा घालण्याची मागणी अनेक संघटनाकडून केली जात होती. या मागणीप्रमाणे न्यायालयाने काही निर्बंध घालत राज्य सरकारकडे निर्णय सोपवला. मात्र दहीहंडी मंडळांच्या मागणीनंतर सरकारने उंच हंड्यांवरील निर्बंध हटवले. यामुळे उंच थर रचण्याच्या नादात व योग्य प्रकारची सुरक्षा न पुरावल्याने २०२ गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी सेंट जॉर्ज रुग्णालयात १०, नायर रुग्णालयात १९, केईएम रुग्णालयात३५, सायन येथील रुग्णालयात २४, राजावाडी रुग्णालयात १२, अग्रवाल रुगालयात ५, गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात ८, कुर्ल्याच्या भाभा रुग्णालयात १, बांद्र्याच्या भाभा रुग्णालयात १४, वि एन देसाई रुग्णालयात ११, अंधेरीच्या कूपर रुग्णालयात ११, डॉ. आंबेडकर रुग्णालयात २०, ट्रॉमा केअरमध्ये १२, एस के पाटील रुग्णालयात ३, मा रुग्णालयात २, सिद्धार्थ रुग्णालयात ११ गोविंदांना उपचार साठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यापैकी १८७ गोविंदवार उपचार करून सोडण्यात आले आहे. तर सेंट जॉर्ज रुग्णालयात २, केईएम रुग्णालयात १, जेजे रुग्णालयात १, नायर रुग्णालयात ४, सायन रुग्णालयात ४, राजावाडी रुग्णालयात ३ गोविदांवर जबर मार लागल्याने उपचार सुरु असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली आहे.