मुंबई / प्रतिनिधी - मुंबईत दहीहंडी फोडण्यासाठी उंच थर रचण्याच्या नादात सुमारे 117 हून अधिक गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी तीन गोविंदाला जबर मार लागला असून, त्यांना रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे तर इतरांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. मुंबईतील एका गोविंदाचा नवी मुंबईतील ऐरोली येथे शॉक लागून मृत्यू झाला आहे.
दहीहंडीसाठी उंच थर लावण्यावर मर्यादा घालण्याची मागणी अनेक संघटनाकडून केली जात होती. या मागणीप्रमाणे न्यायालयाने काही निर्बंध घालत राज्य सरकारकडे निर्णय सोपवला. मात्र दहीहंडी मंडळांच्या मागणीनंतर सरकारने उंच हंड्यांवरील निर्बंध हटवले. यामुळे उंच थर रचण्याच्या नादात व योग्य प्रकारची सुरक्षा न पुरावल्याने 117 गोविंदा जखमी झाले आहेत. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार एकूण 117 गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी नायर रुग्णालयात 12, केईएम रुग्णालयात 21, सायन येथील रुग्णालयात 15, सेंट जॉर्ज रुग्णालयात 1, नायर रुग्णालयात 1, जेजे रुग्णालयात 1 माहात्मा फुले रुग्णालय, विक्रोळी येथे 1, मुलुंडच्या आग्रवाल रुग्णालयात 4, व्ही. एन. देसाई रुग्णालयात 5, कूपर रुग्णालयात7, डॉ. आंबेडकर रुग्णालय, कांदिवली येथे 4, ट्रॉमा केअर गोरेगाव येथे 3 आणि इतर अशा एकूण 117 गोविंदांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी केईएम, नायर आणि सिद्धार्थ रुग्णालयांमध्ये प्रत्येकी एका गोविंदावर उपचार सुरू आहेत. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असले तरी त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले आहे.
ऐरोलीत शॉक लागून मुंबईतील गोविंदाचा मृत्यू -
नवी मुंबईतील ऐरोली येथे शॉक लागून गोविंदाचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली आहे. सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशनच्या दहीहंडीमध्ये हा अपघात घडला. जयेश सरले (३०) असे मयत गोविंदाचे नाव आहे. मुंबईच्या चुनाभट्टी येथील प्रेमनगर गोविंदा पथकाचा तो गोविंदा होता. याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत रबाळे पोलिस ठान्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. शिवसेना ज़िल्हा प्रमुख विजय चौगुले या दहीहंडीचे आयोजक आहेत.
३५ हजार पोलीस तैनात -
दहीहंडी आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलातील ३५ हजार अधिकारी आणि जवान शहरातील अतिसंवेदनशील ठिकाणी तैनात करण्यात आले होते. केंद्रीय व राज्य राखीव बलाच्या १५ तुकड्या, एटीएस, शीघ्रकृती दल तैनात होत्या. दहीहंडी आणि स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यावर ड्रोनसह ५ हजार सीसीटीव्हींच्या माध्यमातून वॉच ठेवला होता.