मुंबई - भारताच्या ७० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईचे महापौर प्रिं.विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते पालिका मुख्यालयात आज (दि. १५ ऑगस्ट २०१७) सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी समस्त मुंबईवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
याप्रसंगी सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षा रोहिणी कांबळे, महापालिका आयुक्त अजोय मेहता, माजी नगरसेवक अवकाश जाधव, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए.कुंदन, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) ए.एल. जऱहाड तसेच उपायुक्त, खाते प्रमुख, सहाय्यक आयुक्त, इतर अधिकारी व मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महापालिका मुख्यालयाच्या आवारातील सर फिरोजशहा मेहता यांच्या पूर्णाकृती पुतळयास महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रारंभी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी महापालिका चिटणीस खात्यातर्फे प्रकाशित करण्यात येणाऱया ‘वार्षिक प्रकाशन - २०१७’ चे महापौरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर सुरक्षा दल व अग्निशमन दलातर्फे महापौरांना मानवंदना देण्यात आली. तसेच ‘बाबासाहेब वरळीकर’ यांच्या ४५ व्या स्मृतीदिनानिमीत्त महापौर दालनातील त्यांच्या प्रतिमेस महापौरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.