मुंबई । प्रतिनिधी -
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळा अत्याधुनिक तंत्रज्ञानासह विद्यार्थ्यांना विविध सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणविषयक स्वप्नपूर्ती साकार करण्यासाठी महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
एफ/दक्षिण विभागातील परळ-भोईवाडा महापालिका शाळा नवीन इमारतीचे लोकार्पण सोहळा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते तर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत परळ भोईवाडा शाळा संकुल, सेंट झेवियर रोड, सशस्त्र पोलीस मुख्यालयासमोर, भोईवाडा, परळ येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक नगरसेविका सुप्रिया मोरे होत्या.
आदित्य ठाकरे म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात अत्याधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब केला जात आहे. व्हर्च्युअल क्लासरुम संकल्पना महापालिका शाळांमध्ये गत तीन वर्षांपासून राबविली जात आहे. महापालिकेच्या शाळा इमारती या सुसज्ज व अत्याधुनिक करण्याकरीता महापालिका प्रशासन करीत असलेले कार्य गौरवास्पद आहे. महापालिका शाळांतून बहुभाषिक पद्धतीचे शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना दिलेले टॅब विविध प्रणालीने विकसित करण्यात आलेले आहेत व महापालिकेचा विद्यार्थी सक्षम होण्यासाठी सर्वतोपरी कार्य करावे, असेही आदित्य ठाकरे यांनी सूचित केले.
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले की, महापालिकेचा विद्यार्थी हा एक उत्तम नागरिक होण्यासाठी योग्य ते संस्कार देणारे शिक्षण देत आहे. विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञानासोबत प्रयोगशाळा, विविध केंद्र उपलब्ध करुन देण्यात येत आहे. खासगी शाळांत ज्या सेवा-सुविधा नाहीत, त्या पुरविण्यासाठी महापालिका प्रशासन कार्य करीत असल्याचेही महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांन सांगितले.
यावेळी स्थानिक खासदार राहुल शेवाळे, स्थानिक आमदार कालीदास कोळंबकर, शिक्षण समितीच्या अध्यक्षा शुभदा गुढेकर यांच्या विशेष उपस्थितीत तर स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर, सुधार समितीचे अध्यक्ष अनंत नर, ‘बेस्ट’ समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) ए. एल. जऱहाड, सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्षा रोहिणी कांबळे, महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा सिंधू मसुरकर, उप आयुक्त (शिक्षण) मिलीन सावंत, माजी महापौर तथा नगरसेविका श्रद्धा जाधव, शिक्षणाधिकारी महेश पालकर, नगरसेवक / नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.