मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरा होणार गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्वासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडप उभारण्यास पालिकेकडून परवानगी मिळत नसल्याचा मुद्दा स्थायी समितीत शिवसेनेने उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले. सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर याची दखल घेत मंडपांच्या परवानगीचे आदेश संबंधित विभाग कार्यालयाना देण्यात आले. त्यामुळे आता गणेशोत्सव मंडऴांना उत्सव साजरा करण्यासाठी पालिकेकडून परवानग्या मिळणार आहे.
गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या काही दिवसांत उत्सवाची धामधुम सुरु होईल. मात्र मंडपासाठीच्या परवानग्यांसाठी प्रशासनाकडून अडचणी येत असल्याने गणेशोत्सव मंडळांची धावपळ उडाली होती. पालिकेच्या 24 विभागातून 5 ऑगस्ट पर्यंत मंडपासाठी परवानगी घेण्याचे परिपत्रक पालिकेने काढले होते. त्यानंतर परवानगी मिळणार नाही असे फरमान पालिका प्रशासनाने काढल्याने गणेश मंडळांमधे कामालीचा असंतोष निर्माण झाला होता.
शिवसेनेचे सदस्य मंगेश सातमकर यांनी या प्रकरणी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीचा मुद्दा मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले. 5 ऑगस्ट नंतर विभाग कार्यालयातून परवानग्या देणे बंद केल्यामुळे आयोजकांची मोठी अड़चण झाली आहे. सहायक आयुक्त आणि उपायुक्त याना परवानग्या देण्यासंदर्भात सक्त सूचना आयुक्तांनी द्याव्या अशी मागणी सातमकर यानी हरकतीच्या मुद्दयाद्वारे केली. शिवाय शुल्क आकारून यापुढे परवानगीसाठी येणाऱ्या मंडळाना परवानगी द्यावी अशीही मागणी त्यानी यावेऴी केली.
स्थायी समितीत हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय़ सिंघल यांनी गंभीर दखल घेऊन गणेशोत्सव मंडळांचे मंडपांच्या परवानगीसाठी येणारे अर्ज त्वरीत स्वीकारण्याचे आदेश दिले. त्य़ामुळे गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे.