सफाई कर्मचार्यांचे मुख्यालयासमोर आंदोलन
मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने सफाईचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेल्या सहा महिन्याचा पगार देण्यात आलेला नाही. याच्या निषेधार्थ कंत्राटदार आणि प्रशासनाचा निषेध करण्यासाठी पालिका मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
मुंबई पाहापालिकेत सहा हजारांहून जास्त सफाई कर्मचारी काम करतात. त्यांना १४ हजार ३०० रुपये इतका पगार मिळतो. मात्र यातील ८०० कर्मचार्यांना गेल्या सहा महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही. त्यामुळे या कर्मचार्यांसमोर घर कसे चालवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही. या पार्श्वभूमीवर कचरा वाहतूक श्रमिक संघाच्या वतीने पालिकेत आंदोलन करण्यात आल्याचे सेक्रेटरी विजय दळवी यांनी सांगितले. पगाराबाबत विचारणा करण्यास जाणार्या कर्मचार्यांना जीएसटीची कार्यवाही करण्यास वेळ होत असल्यामुळे पगारास विलंब होत असल्याचे कारण दिले जात आहे. मात्र पगार मिळत नसल्याने शेकडो कर्मचार्यांना घर चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे पगाराबाबत तातडीने निर्णय घ्या अन्यथा थेट आयुक्तांचा दालनात आंदोलन करू असा इशाराच संघाच्या वतीने देण्यात आला आहे.