मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा शैक्षणिक स्तर खालावत चालला असल्याने विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. पालिकेच्या शाळांचा खालावलेला दर्जा उंचावण्यासाठी मुंबईतील पाच नामांकित तज्ज्ञांची समिती नियुक्त करून त्यांच्या अहवालानुसार महापालिकेच्या शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल करण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. सदर सूचना पालिका सभागृहामध्ये मंजूर झाली असल्याने पालिका शिक्षणाचा स्तर उंचावण्यास मदत होणार आहे.
मुंबई महानगरपालिका एकूण ११९५ शाळांमधून विविध भाषांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. पालिका शाळांकरिता अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद असून याद्वारे विद्यार्थ्यांना २७ शालोपयोगी वस्तूंचे मोफत वाटप करण्यात येते, पालिकेकडे विविध ठिकाणी प्रशस्त शाळा, शालेय विद्यार्थी, अनुभवी शिक्षक तसेच इतर सुविधा असतानाही पालिका शाळांच्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येमध्ये घट होत आहे . याचे प्रमुख कारण शिक्षणाचा घसरलेला दर्जा हे आहे. त्यामुळे शालेय प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होतो. पालिकेने आपल्या काही शाळा खाजगी संस्थांना चालविण्यास देणार आहे. यामुळे गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्तिथ होईल, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात काळाची गरज ओळखून इंग्रजी व मराठी माध्यमांचा समन्वय साधून पालिकेच्या शाळांमध्ये ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. पालिका शाळातील शिक्षणाचा स्तर उंचावण्याची गरज आहे. याचा विचार करून मुंबईतील नामांकित शाळातील शिक्षण तज्ज्ञांची समिती नियुक्त केल्यास प्राथमिक व माध्यमिक शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल होऊन पालिका शाळातील शिक्षणाचा स्तर उंचावेल असे प्रकाश गंगाधरे यांनी म्हटले आहे