मुंबई | प्रतिनिधी - 17 August 2017 -
महापालिकेतील अनुकंपा तत्त्वावरील हाजारो पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्यासाठी यापुढे मार्गदर्शक धोरण तयार केले जाणार आहे. ज्यामुळे साडेचार वर्ष प्रलंबित राहणारी प्रकरणे तात्काळ निकाली निघतील, असे ग्वाही पालिका अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिली.
मुंबई महापालिकेत अनुकंपा तत्वाअंतर्गत पदे भरली जातात. स्थायी समितीत रिक्त भरण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला होता. नगरसेवकांनी यावर हरकत घेऊन, रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी केली. अनुकंपातंर्गत रिक्त पदासाठी हजारो अर्ज येतात. परंतु, या अर्जांची फाईल सहा सहा महिने अधिकाऱ्यांच्या टेबलवर पडून असते. यामुळे हजारो अर्ज गेल्या साडेचार वर्षांपासून धूळ खात पडून आहेत. प्रशासनाला त्याचे काही घेणं देणं नाही. परिणामी अनुकंपा तत्त्वावरील कामगारांचे नुकसान होत आहे. त्यामुळे अशा कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी मार्गदर्शक धोरण तयार करावे, तांत्रिक कारणे देऊन कामगारांची अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक मंगेश सातमकर केली. यावेळी पालिका सुरक्षा रक्षकांची शेकडो पदे गेल्या साडेचार वर्षांपासून रिक्त असल्याची बाब त्यांनी निर्दशनात आणून दिली.
दरम्यान, कामगारांना न्याय द्यावा, रिक्त पदे तात्काळ भरावीत, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर यांनी दिले. याबाबत तात्काळ विचार केला करून मार्गदर्शक धोरण तयार करण्यात येईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त सिंघल यांनी दिले.