मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगपालिकेकडून रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे करताना काही खाजगी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे पालिकेच्या खर्चाने केले जात असून एका आमदाराच्या दबावाने काही पालिका अधिकारी असे प्रस्ताव मंजूर करून घेत असल्याचा आरोप मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी स्थायी समितीत केला. रस्ते दुरुस्तीच्या प्रस्तावातून असे खाजगी रस्ते वगळण्यात यावेत आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
पूर्व उपनगरातील एल,एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील विविध रस्त्यांची सुधारणा करण्या संदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीत आला होता. या मध्ये एकूण २७ रस्ते व एक चौक असे एकूण २८ कामांच्या मंजुरी साठी स्थायी समितीत सदर प्रस्ताव आणला होता. या प्रस्तावावर बोलताना दिलीप लांडे यांनी एल विभागातील काही खाजगी रस्ते स्थानिक आमदाराच्या दबावामुळे सदर प्रस्तावात समाविष्ट केला असल्याचा आरोप केला. या मध्ये त्यांनी शमा अपार्टमेंट-जरीमरी, मुस्तफा मार्केट-भंगार गल्ली लेन नंबर ३ आणि ४, वायर गल्ली नंबर २,कणकाली चाळ रस्ता सरोवर हॉटेल समोर, नाहर गेट जवळ फिरदोस कंपाऊंड आणि शरीफ मार्केट येथील खाजगी रस्ते स्थानिकआमदाराच्या सूचनेनुसार पालिकेच्या खर्चातून दुरुस्ती करणे चुकीचे असल्याचे लांडे यांनी सांगितले. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी सदर प्रस्तावातील खाजगी रस्त्यांची कामे वगळण्यात येतील. असे स्पष्ट करत पालिका खर्चातून कुठली खाजगी रस्ते दुरुस्त करण्यात येणार नसल्याचे सांगितले.