मुंबई । प्रतिनिधी -
बेस्टची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने बेस्टला वाचवण्यासाठी विविध उपाय, पर्याय व सूचना मुंबईतील ज्येष्ठ वाहतूकतज्ञांनी बेस्टमध्ये संपन्न झालेल्या विशेष बैठकीत मांडले. त्यावर महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी वाहतूकतज्ञांनी बेस्टसंदर्भात दाखविलेल्या आत्मीयतेबद्दल आभार मानत चर्चेतून आलेल्या अनेक चांगल्या सूचनांचे स्वागत केले. या बैठकीतून आलेल्या मुद्द्यांच्या आधारे मुंबई पालिका आयुक्तांकडे चर्चा केली जाणार असून वाहतूक तज्ञांनी बैठकीत सहभागी होण्याचे आवाहन अनिल कोकीळ यांनी केले.
बेस्टला आर्थिक डबघाईतून वाचवण्यासाठी मुंबईतील काही तज्ञांनी अनेक उपाय योजना व सूचना बेस्ट समिती अध्यक्ष व पालिका आयुक्तांकडे केल्या होत्या. या निवेदनाच्या आधारे बेस्टने या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत बेस्टचे अध्यक्ष अनिल कोकीळ, महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांच्या उपस्थिती अमिता भिडे, सुधीर बदामी, ज्येष्ठ पत्रकार विद्याधर दाते, अजित शेणॉय, सिमप्रीत सिंह, तृप्ती अमृतवार वैतिला, गिरीश श्रीनिवासन आदी उपस्थित होते.
बैठकीत दरम्यान तज्ञांनी बेस्टला राज्य सरकार, मुंबई पालिकेने अर्थसहाय्य पुरविणे, चांगल्या दर्जाच्या बसेस आणि सेवा पुरविणे, कमी अंतरावरील प्रवाशांना आकृष्ट करणे, बेस्टचा अर्थ संकल्प महापालिकेत विलीनीकरण, बेस्ट उपक्रमाच्या आगारांमधील मोकळ्या जागा कॉर्पोरेट संस्थांना भाड्याने देण्यात यावे, बेस्ट बसगाड्यांसाठी खासकरून पश्चिम द्रुतगती महामार्गावर विशेष बसमार्गिका मिळाव्यात, राज्य सरकार,महापालिकेने बेस्ट उपक्रमाला करमुक्त करावे, बेस्ट बसगाड्यांमध्ये जीपीएस यंत्रणा कार्यरत करावी.
बेस्टच्या बसथांब्यावर बसमार्गांचा नकाशा लावण्याबाबत, बसआगारांमधील मोकळ्या जागेचा वापर खासगी वाहनांच्या पार्किंगसाठी करावा, बेस्टला चालना देऊन ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी करता येईल, बस भाड्याचे सुसूत्रीकरण करावे, मोनो, मेट्रो,रेल्वे, प्रमाणे बसला ही रस्त्यावर ट्रॅक तयार करावा, आगामी काळात येणाऱ्या इलेक्ट्रिक खासगी वाहनांना चार्जिंगची सोय उपलब्ध करून उत्पन्न वाढ करावी असे अनेक पर्याय सुचवले आहेत.