मुंबई / प्रतिनिधी - बेस्टने ४५ लाख प्रवासी प्रवास करत होते. बस तिकिटांमध्ये वाढ केल्याने प्रवासी संख्येत घट होऊन प्रवासी संख्या २९ लाखांवर आली आहे. बेस्ट प्रवाशांची संख्या गेल्या आठ वर्षांत एक तृतीयांश इतकी कमी झाली आहे. प्रवाश्यांच्या या संख्येत आणखी घट होण्याची चिंता तज्ञांनी वर्तवली आहे. बेस्टचे तिकिटाचे दर आणखी वाढले तर इतर पर्यायी वाहतूक न परवडणाऱ्या प्रवाशांना चालत जाण्यावाचून पर्याय राहणार नसल्याने त्यांच्या रोजगारावर परिणाम होण्याचा धोका तज्ञांनी वर्तविला आहे. बेस्ट भाड्यावर बस घेण्याचा विचार करत आहे. असे झाल्यास बस बेस्टमधील अनुभवी ड्रायव्हरऐवजी कंत्राटदारांकडून कमी वेतनावरील कंत्राटी ड्रायव्हरमुळे प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नही निर्माण होईल, असाही मुद्दाही तज्ञांनी मुंबई पालिका आयुक्त आणि बेस्ट अध्यक्षांना दिलेल्या निवेदनात मांडला आहे.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या अमिता भिडे, मुंबई एन्व्हॉयन्मेंटल सोशल नेटवर्कचे अध्यक्ष-ट्रस्टी अशोक दातार, शहर अभ्यासक सुधीर बदामी, पब्लिक ट्रान्सपोर्ट नीड प्रायोरिटी‘चे लेखक विद्याधर दाते, अभ्यासक रजनी देसाई, फोरम ऑफ एन्व्हायरमेन्टल जर्नालिस्ट इन इंडियाचे अध्यक्ष डॅरिल डीमाँट, मुंबई विकास समितीचे सदस्य ए. व्ही. शेणॉय, राइट टू द सिटी कॅम्पेनचे सदस्य सिमप्रीत सिंह, तृप्ती अमृतवार वैतिला इत्यादी संघटनांनी पालिका आयुक्त आणि बेस्ट अध्यक्षांना निवेदन दिले आहे. या निवेदनात २००३ मध्ये विद्युत कायदा येण्यापूर्वी बेस्टच्या विद्युत उपक्रमातील नफा परिवहन उपक्रमातील तोटा भरून काढत असे. त्यानंतर हा तोटा भरून काढण्याची जबाबदारी मुंबई पालिकेची असली तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे म्हटले आहे.
यामुळे पालिकेने बेस्टला आर्थिक सहाय्य देणे आवश्यक आहे. बेस्टला आर्थिक पाठबळ मिळाल्यास सेवा, फेऱ्यांमध्ये वाढ होऊन त्याचा प्रवाशांना लाभ होईल. पालिकेप्रमाणेच राज्य सरकारनेही बेस्ट उपक्रमावरील करांचा बोजा कमी करावा, अशी भूमिकाही निवेदनात मांडली आहे. बेस्ट उपक्रमावरील करांचे प्रमाण कमी करणे, बेस्टकडील कर्जांचे भागभांडवलात रूपांतर करणे, पार्किंग शुल्कातून मिळणाऱ्या काही रक्कमेचा भाग बेस्टला मिळणे, असे काही उपाय बेस्ट बचावासाठी उपयुक्त ठरतील असे मत अभ्यासकांनी मांडले आहे. बेस्ट उपक्रम सार्वजनिक वाहतूक सेवा असल्याने त्याकडे केवळ नफ्याच्या दृष्टिकोनातून न पाहता सामान्यांच्या सेवेच्या दृष्टकिोनातून पाहण्यात यावी असे सुचवण्यात आले आहे. बेस्ट रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम’ (बीआरटीएस) वाहतूककोंडीवर उत्तर ठरू शकते. बीआरटीएसमुळे मेट्रोपेक्षा २५ टक्के जास्त प्रवासी क्षमता वाढेल, असा सल्लाही या तज्ञांनी दिला आहे. तसेच बेस्टने प्रवाशांच्या दृष्टीने आरामदायी, मार्गांचे योग्य व्यवस्थापन, बसमध्ये जीपीएस प्रणालीसह बससेवांची माहिती देणारे अॅप पुरविणे, तिकीटदरांत कपात आदी उपायही सुचविले आहेत.