बस भाडेवाढ, कर्मचाऱ्यांचे भत्ते गोठण्याची शिफारस
बस ताफा कमी करून भाडेतत्वावर बस घेणार
मुंबई । प्रतिनिधी
बेस्ट प्रशासनाने सादर केलेला कृती आराखडा रद्द करण्यात आल्यानंतर पुन्हा नव्याने उपक्रमाची हलाखीची आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरिता अमलात आणावयाच्या विविध योजनांच्या नावाने नवा कृती आराखडा सादर करण्यात आला आहे. नव्याने सादर करण्यात आलेल्या आराखड्यानुसार बसचालवण्यासाठी होणारा खर्च आणि त्यामधून येणारे उत्पन्न ५० टक्केच असल्याने दुप्पट भाडेवाढ करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. कर्मचाऱ्यांचे विविध भत्ते गोठवणे, बसताफा कमी करून भाडेतत्वावर बस घेणे, तसेच कर्मचारी कमी करण्याची शिफारस प्रस्तावाद्वारे करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव बेस्ट समितीपुढे सादर करण्यात आला आहे.
बेस्ट समितीपुढे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार बेस्टचे कमीत कमी २ किलोमीटरसाठी ८ रुपयांऐवजी १६ रुपये इतके भाडे आकारावे अशी सूचना करताना प्रवासी घाटतील अशीही भीती व्यक्त करण्यात आली आहे. याकारणाने सर्वच भुर्दंड प्रवाश्यांवर पडू नए म्हणून ४ किलोमिटर पर्यंत कोणतीही भाड़ेवाढ न करता ६ ते ३० किलोमिटर पर्यंत १ ते १२ रुपये इतकी भाड़ेवाढ करण्याचे सुचवण्यात आले आहे. तर एसी बससाठी ५ ते २० रूपयांची भाड़ेवाढ सुचवण्यात आली आहे.
सदर आराखड्यात ७०, ५० व ४० रुपयांचे दैनिक पास दरात फेरबदल करून ९०, ६० व ५० रुपये घ्यावेत असे नमूद करण्यात आले आहे. आनंदयात्री योजने अंतर्गत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत बसपासवर ५० टक्के सवलत देण्यात येते. या योजनेला अल्प प्रतिसाद असल्याने योजना बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांचा बस पास १५० रुपये तर कनिष्ठ महाविद्यालययातील विद्यार्थ्यांचा बस पास ३०० रुपये आहे यात वाढ करून पाचवी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांचा बस पास २०० रुपये, सहावी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा बस पास २५० रुपये तर कनिष्ठ महाविद्यालययातील विद्यार्थ्यांचा बस पास ३५० रुपये करण्याचे प्रस्तावित केले आहे.
प्रशासकीय उपाययोजना म्हणून कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता गोठवावा, "ब" श्रेणी अधिकाऱ्यांचा कार्यभत्ता खंडित करावा, वैद्यकीय भत्ता खंडित करावा, मनुष्यबाळाचे नियोजन करण्यासाठी कर्मचाऱ्यांत कपात व भरती पूर्णतः बंद करावी, शैक्षणिक सहाय्य बंद करावे, शिष्यवृत्ती योजना बंद करावी, उपहारगृह कंत्राटदारांना देण्यात येणारी अर्थसहाय्य बंद करावी, रजा प्रवास भत्ता गोठवावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना बसपास योजना बंद करावी, रोख रक्कम हाताळणी भत्ता बंद करावा, अतिकालीन, अ व ब श्रेणीतील अधिकाऱ्यांचा प्रवासभत्ता बंद करावा, सेवा सातत्य योजना तयार करावी अश्या अनेक उपाययोजना या आराखड्यात सुचवण्यात आल्या आहेत.
जुलै अखेरीस बेस्टचा ताफा ३७९० इतका होता. त्यातील ४५३ बसगाड्या मोडीत काढून ताफा ३३३७ इतका करावा, ४० टक्के पेक्षा कमी वसुली असलेल्या मार्गांचा पुनर्विचार करण्याचे तसेच अकार्यक्षम १७०३ बसगाड्या मोडीत काढून १२५० मिनी, मिडी, वातानुकूलित बसगाड्या भाडेतत्वावर घ्यावात असे प्रस्तावित करण्यात आले आहे. दरम्यान असा प्रस्ताव या आधीही बेस्ट समितीने फेटाळला असल्याने नव्याने सादर करण्यात आलेल्या या कृती आराखड्याला बेस्ट समिती व कर्मचाऱ्यांकडून विरोध केला जाणार आहे.
प्रस्तावित भाड़ेवाढ पुढीलप्रमाणे साधी बस भाड़ेवाढ
किमी ......सध्याचे भाड़े....प्रस्तावित भाड़े.... भाडेवाड
2 .............Rs 8 ...............Rs 8 ............ -
4 .............Rs 10 .............Rs 10 ........... -
6 .............Rs 14 .............Rs 15 ...........Rs 1
8 .............Rs 16 .............Rs 18............Rs 2
10 ...........Rs 18 .............Rs 22............Rs 4
12 ...........Rs 20 .............Rs 25............Rs 5
14 ...........Rs 22 .............Rs 28 ...........Rs 6
20 ...........Rs 26 .............Rs 34............Rs 8
30 ...........Rs 30 .............Rs 42 ...........Rs 12
एसी बस भाड़ेवाढ
किमी ... सध्याचे भाड़े .....प्रस्तावित भाड़े
2 .............Rs 15 .............Rs 20
4 .............Rs 20..............Rs 25
6 .............Rs 25 .............Rs 30
8 .............Rs 30 .............Rs 35
10 ...........Rs 35 .............Rs 40
20 ...........Rs 60 .............Rs 60
25 .......... Rs 75 .............Rs 65
30 ...........Rs 90 .............Rs 70