मुंबई / प्रतिनिधी - बेस्ट आर्थिक संकटात असताना बेस्टचे उत्पन्न ‘इस्क्रो’ अकाऊंटमध्ये जमा केले जात होते. या आकाउंटमधून आधी पालिकेचे कर्ज फेडले जात होते नंतर उरलेली रक्कम बेस्ट आपल्यासाठी वापरत होती. यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पगार देणेही मुश्किल झाले होते, मात्र आता ‘इस्क्रो’ अकाऊंटच्या जाचक अटीतून ‘बेस्ट’ची सुटका होणार आहे. महापालिकेकडून घेतलेल्या १६०० कोटींच्या कर्जाचा परतावा महिन्याच्या पहिल्या तारखेला न करता तो २० तारखेनंतर करण्याबाबत करारातील अटी शिथील करण्यासाठी पालिका प्रशासनाने विधी विभागाला आदेश दिले आहेत. यामुळे ४०.५८ कोटींची रक्कम ‘बेस्ट’ला २० दिवस दैनंदिन व्यवहार करण्यासाठी मिळणार आहे.
महापालिकेने ‘बेस्ट’ला जानेवारी २०१३ मध्ये १६०० कोटींचे कर्ज दिले आहे. यावेळी महापालिका प्रशासन आणि ‘बेस्ट’ यांच्यात झालेल्या करारानुसार कर्जाची मुद्दल आणि व्याज महिन्याच्या पहिल्या तारखेला ‘बेस्ट’च्या उत्पन्नातून थेट आयसीआयसीआय बँकेत उघडलेल्या ‘इस्क्रो’ अकाऊंटमध्ये जमा होते. यामध्ये बेस्टला मिळणारे सर्व उत्पन्न महिन्याच्या एक तारखेला जमा होते. त्यानंतर महापालिकेच्या स्टेट बँक ऑफ इंडियातील सर्वसाधारण निधी खात्यात कर्जाची मुद्दल आणि व्याज जमा होते. मात्र हे ४०.५८ कोटी आयसीआयसीआय बँक पुढील २६ ते २७ दिवस स्वत:कडे गोठवून ठेवते. इतकी मोठी रक्कम आयसीआयसीआय बँकेकडे जमा राहिल्यामुळे त्याचा फायदा त्या बँकेला होतो. मात्र ‘बेस्ट’ आर्थिक डबघाईला आली असताना ‘बेस्ट’ला सहकार्य व्हावे म्हणून ‘बेस्ट’ समितीने ही रक्कम २० तारखेनंतर जमा करण्यासाठी कराराच्या अटी शिथील कराव्यात असा प्रस्ताव मंजूर करून पालिका प्रशासनाकडे पाठवला होता. याबाबतच्या कार्यवाहीनंतर पालिका प्रशासनाने करारातील अटी शिथील करण्याचे आदेश विधी विभागाला दिले आहेत. ‘इस्क्रो’ अकाऊंटमध्ये महिन्याच्या पहिल्या तारखेपासूनच जमा होणारी रक्कम १ तारखेपासून गोठवण्याऐवजी ती २० तारखेपासून गोठवावी. त्यानंतर महापालिकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात यावी. त्यामुळे आर्थिक डबघाईला आलेल्या बेस्ट उपक्रमाला दैनंदिन व्यवहार करण्यास मदत होईल असे बेस्टच्या महाव्यस्थपाकांचे म्हणणे आहे. ‘इस्क्रो’ अकाऊंट बंद करण्याची मागणी सर्वप्रथम मागणी बेस्ट समिती सदस्य सुनिल गणाचार्य यांनी केली होती. त्यानंतर अशीच मागणी बेस्ट समिती अध्यक्ष व नगरसेवक अनिल कोकीळ यांनी उचलून धरली होती.