साठे कुटुंबीयांचे साखळी उपोषण -
मुंबई । प्रतिनिधी -
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्या, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्या, अण्णाभाऊंचे राष्ट्रीय स्मारक उभारा आणि मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा अशा मागण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबीयांनी बुधवारपासून आझाद मैदानात साखळी उपोषण सुरू केले आहे.
लहुजी साळवे अभ्यास आयोगाची तत्काळ अंमलबजावणी करा, घाटकोपर चिरागनगरमधील अण्णाभाऊंचे घर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करा, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे वार्षिक बजेट ५०० कोटी करावे, कर्जवाटप खादी ग्रामोद्योगाच्या धरतीवर सुरू करावे, अण्णाभाऊ साठे महामंडळातील गैरव्यवहारामुळे होत असलेली अण्णाभाऊंच्या नावाची बदनामी थांबवावी, गरजू, गरीब व कुशल कारागिरांना पूर्ववत कर्जवाटप करावे, शैक्षणिक कर्ज पुर्ववत करावे, प्रत्येक जिल्ह्यात कर्जवसुली अधिकारी नेमून त्याला अधिकार व संरक्षण द्यावे, गायरानी जमिनी देऊन त्या लाभार्थींच्या नावे कराव्यात इत्यादी मागण्यांसाठी उपोषण करण्यात येत आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे अमूल्य योगदान आहे. याची शासनाने दखल घेऊन त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा आणि प्रलंबित मागण्यांसाठी अण्णाभाऊ साठे यांची सून सावित्रीबाई मधुकर साठे, सचिन संजय साठे (नातू), जाईबाई साठे-भगत (अण्णांची बहीण), गणेश रमेश भगत (नातू), सुवर्णा मधुकर साठे (नात), ज्योती साठे-भगत (नात) यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण १८ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. याची दखल शासनाने घेतली नाही तर महाराष्ट्र पिंजून काढून मातंग समाजात जनजागृती करण्यात येणार आहे. त्यानंतर मंत्रालयावर धडक देणार असल्याचे अण्णाभाऊंच्या कुटुंबीयांनी सांगितले.