नवी दिल्ली - मोदी सरकारने बँक अकाउंट उघडण्यासाठी, पॅन कार्ड, मोबाईल सिम कार्ड तसेच सरकारी अनुदान मिळवण्यासाठी 'आधार' नंबरची सक्ती केली आहे. त्यानंतर आता मृत्यू प्रमाणपत्रासाठीही आधार कार्ड बंधनकारक केले आहे. १ ऑक्टोबरपासून मृत्यूचा दाखला काढताना मृत्यू झालेल्या व्यक्तीचा आधार कार्ड क्रमांक देणे बंधनकारक केले आहे.
भारताचे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (आरजीआय) यांनी यासंबंधी एक परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकात मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्यांना मृत व्यक्तीचा आधार क्रमांक द्यावा लागणार आहे, असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. मृत्यूचा दाखला काढताना मयत व्यक्तीचा आधार कार्ड क्रमांक दिल्याने मयत व्यक्तीच्या आधार कार्डचा गैरवापर होणार नाही. मृत व्यक्तीच्या नावे आधार कार्ड नसल्यास अर्जदाराला मृत व्यक्तीचे आधार कार्ड नसल्याची माहिती नमूद केलेले प्रमाणपत्र द्यावे लागेल. आरजीआयने देशातील सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना १ ऑक्टोबरपासून या निर्णयाचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. हा नियम जम्मू-कश्मीर, आसाम आणि मेघालय वगळता सर्व राज्यांसाठी लागू होणार आहे.