बोगस जात प्रमाणपत्र सादर करणाऱ्या ६ नगरसेवकांचे पद रद्द - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 August 2017

बोगस जात प्रमाणपत्र सादर करणाऱ्या ६ नगरसेवकांचे पद रद्द


मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महापालिकेच्या फेब्रुवारीत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या २२७ नगरसेवकांपैकी सहा नगरसेवकांचे जातप्रमाणपत्र जातपडताळणी समितीने रद्द केले आहे. यामुळे या नगरसेवकांनी बोगस जातप्रमाणपत्र सादर केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना नगरसेवकपदास मुकावे लागणार आहे. मध्ये काँग्रेसच्या २, भाजपाच्या ३, आणि एका अपक्ष नगरसेवकाचा समावेश आहे.

मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६२ मधून निवडून आलेले अपक्ष नगरसेवक चंगेज मुलतानी यांचे जातप्रमाणपत्र बोगस आढळण्याने जात पडताळणी समितीकडून त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले. तर प्रभाग क्रमांक २८ मधून निवडून आलेले काँग्रेसचे राजपती यादव यांचेही जात प्रमाणपत्र बोगस आढळले आहे. प्रभाग क्रमांक ८१ मधून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले मुरजी पटेल व त्यांची पत्नी केशरीबेन पटेल या दोघांचेही अर्ज जातपडताळणीत बोगस आढळले आहे. तसेच भाजपच्या प्रभाग क्रमांक ७२ चे नगरसेवक पंकज यादव यांचेही जात प्रमाणपत्र बोगस आढळले आहे.

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या ट्युलिप मिरांडा यांचे नगरसेवक पद जात पडताळणी समितीने बाद ठरविले आहे. ट्युलिप मिरांडा यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देत स्थगिती आदेश मिळवला आहे. इतर चारही बाद नगरसेवक जात पडताळणी समितीच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे समजते. यामुळे तूर्तास तरी त्यांच्या नगरसेवकपदाला अभय मिळाले आहे.

१० वर्षांत १४ नगरसेवकांचे पद रद्द -
गेल्या १० वर्षांत १४ नगरसेवकांची पदे बाद झाली आहेत. यामध्ये जातीच्या बोगस प्रमाणपत्रासह दोनहून अधिक अपत्ये असलेल्या नगरसेवकांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. २०१२ ते २०१७ या काळात चार नगरसेवकांची पदे रद्द झाली आहेत. यामध्ये अनुषा कोडम, भावना जोबनपुत्रा, मोहमद इसाक यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले. तर सिराज शेख यांचे पद दोनहून अधिक अपत्ये असल्याने रद्द ठरले. २००७ ते २०१२ या काळात शिरीष चोगले, सुनील चव्हाण, लालजी यादव, रश्मी पहुडकर, नारायण पवार, प्रवीण देव्हारे, विश्वनाथ महाडेश्वर, सुभाष सावंत, अंजुमन असलम, सिमिंतीना नारकर, भारती घोंगडे यांचे पद जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने बाद झाले होते.

Post Bottom Ad