मुंबई, दि. २८ : शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने अनधिकृत शाळांवर कारवाई करून त्यांचे समायोजन नजीकच्या अधिकृत शाळांत करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिली. राज्यातील अनेक शाळांना सीबीएसई आणि शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता नसतानाही विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. यासंदर्भात सदस्य मेधा कुलकर्णी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना तावडे बोलत होते.
तावडे म्हणाले, नवीन नियमांनुसार शाळांची अधिक तपासणी करण्यात येईल. निकषांत न बसणाऱ्या अनधिकृत शाळांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश सर्व शिक्षण निरीक्षक आणि शिक्षणाधिकरी यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार शाळा बंद झाल्यावर विद्यार्थ्यांचे नजीकच्या मान्यताप्राप्त शाळेत समायोजन करण्यात येईल.