मुंबई,दि.२७ : अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये झालेल्या दिरंगाई व त्रुटीबाबत या प्रवेश प्रक्रियेचे काम पाहणाऱ्या न्यासा एशिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेसोबत झालेल्या करारनाम्यातील अटी व शर्ती व निविदितेतील तरतुदी विचारात घेऊन संस्थेवर दंडात्मक कारवाईची सुरुवात करण्यात आली आहे, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले.
राज्यातील अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी मुंबईसह सात विभागीय केंद्रांवर प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली. मुंबई, पुणे येथील विद्यार्थी संख्या मोठया प्रमाणावर आहे. मुंबईत २लाख ६८ हजार एवढे विद्यार्थी आहेत. त्यामुळे एकाचवेळी या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत ८ लाख जणांच्या लॉगइन करण्याची क्षमता असणाऱ्या सर्व्हरची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र त्या तुलनेत प्रवेशासाठी १५ लाख लोकांनी लॉगइन केले त्यामुळे या सर्व्हरची क्षमता वाढविण्यासाठी सर्व्हर ट्रान्सफर करताना अडचणी उद्भवल्या होत्या. त्यामुळे वैयक्तिकरित्या स्वत: गुणवत्ता यादीचे निरीक्षण करुन पहिली प्रवेशाची यादी प्रसिद्ध केली. कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून संपूर्ण सांख्यिकीय माहिती बारकाईने तपासल्यामुळे ही यादी प्रसिद्ध करण्यास विलंब झाला.
२४२ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरताना विहित पध्दतीचा अवलंब न केल्याने चूक झाली होती मात्र या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल. अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालयांनी मागणी केल्यानुसार वाढीव तुकड्यांना मान्यता देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे विद्यार्थ्याची गुणवत्ता व त्या विद्यार्थ्याने दिलेल्या महाविद्यालयाचा पसंतीक्रम यावर अवलंबून आहे. या ऑनलाईन प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना लांबच्या महाविद्यालयात प्रवेश मिळतो ही व्यावहारिक अडचण आहे. यासंदर्भात लवकरच लोकप्रतिनीधींसोबत बैठक घेण्यात येईल व आवश्यकता पडल्यास राज्याच्या महाधिवक्त्यांशी चर्चा करण्यात येईल. विद्यार्थी प्रवेशाची क्षमता पाहून सर्व्हरची व्यवस्था केली जाते. पुढील वेळेस यापेक्षा जास्त क्षमतेच्या सर्व्हरची व्यवस्था करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सध्या मुंबई महानगर क्षेत्रासह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर येथे प्रवेश प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचे तावडे यांनी सांगीतले. या चर्चेमध्ये सदस्य राज पुरोहित, राधाकृष्ण विखे-पाटील, सुनील प्रभू, अमिन पटेल,कॅप्टन तमिल सेल्वन, वर्षा गायकवाड, सुनील देशमुख, अस्ल्ाम शेख या सदस्यांनी सहभाग घेतला.