मुंबई. दि, २६ : मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या एकूण ४७७ परीक्षांच्या निकालापैकी १०४ परिक्षांचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले असून उर्वरित निकाल ३१ जुलै २०१७ पर्यंत जाहीर केले जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज दिली. मुंबई विद्यापीठाच्या परिक्षांच्या निकालासंदर्भात विधानपरिषदेत सदस्य शरद रणपिसे, यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना तावडे बोलत होते.
मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या एकूण ४७७ पैकी १०४ परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये कला, वाणिज्य, विधी आणि व्यवस्थापन विभागाच्या अशा ७० टक्के उत्तरपत्रिका तपासून झाल्या असून उर्वरीत उत्तर पत्रिका तपासून ३० जुलैच्या आत या विभागांचा निकाल लावण्यात येणार आहे. हे काम जलद गतीने पूर्ण होण्यासाठी पेपर तपासणीसांची संख्या वाढविण्यात येणार आहे. नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापकांची पेपर तपासण्यासाठी मदत घेण्यात येत आहे. तसेच ऑनलाईन उत्तर पत्रिका तपासणीचे काम ज्या कंपनीला देण्यात आले आहे त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांचे निकाल वेळत जाहीर होण्यासाठी आणि निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका लवकरात लवकर देण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती तावडे यांनी दिली.
विद्यापीठातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार असून, या प्रकरणासंबंधित ज्या संस्था आहे त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. उशीरा निकाल लागल्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिका फेरतपासणीसाठी घेण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये सवलत देण्यात येणार आहे. तसेच मुंबई विद्यापीठाच्या एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, आणि उत्तरपत्रिका तपासताना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही असे तावडे यांनी सांगितले. या लक्षवेधीत सदस्य अनिल परब, हेमंत टकले, डॉ. नीलम गोऱ्हे,ॲड. निरंजन डावखरे,आदींनी सहभाग घेतला.