मुंबईकरांची धरणे तुडुंब भरायला लागली -
मुंबई / प्रतिनिधी - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात गेले महिनाभर चांगला पाऊस पडत असल्याने धरणे तुडुंब भरायला लागली आहेत. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये जुलै महिन्यातच साडे नऊ लाख दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीपुरवठा मुंबईकरांना २५२ दिवस पुरेल इतका आहे. यामुळे पुढील वर्षी मुंबईकरांना पाण्याची समस्या उद्भवणार नाही.मुंबईला सात धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. यापैकी असलेले मोडक सागर धरण १५ जुलैला सकाळी ओव्हरफ्लो झाल्याने धरणाचे दोन गेट उघडण्यात आले आहेत. या धरणातून मुंबईला दररोज ४५५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. मोडक सागर धरणा पाठोपाठ तानसा धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. तानसा धरणात १२८.६३ मीटर पर्यंत पाणी साठवण्याची क्षमता आहे १६ जुलै रोजी सकाळ पर्यंत तानसा धरणात १२७.५७ मीटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. तानसा धरणं भरायला फक्त एक मीटर बाकी आहे. धरण क्षेत्रात असाच पाऊस राहिल्यास येत्या दोन तीन दिवसात तानसा धरणही भरून वाहू लागणार आहे.
मुंबईला वर्षभर चांगला पाणी पुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलश लिटर पाणीसाठा असणे अवाश्यक आहे. १६ जुलैच्या पहाटेच्या ६ वाजताच्या पाण्याच्या अहवालाप्रमाणे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ९ लाख ४८ हजार ३३५ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा मुंबईकरांना २५२ दिवस पुरु शकतो. सप्टेंबर अखेर पर्यंत पाऊस पडत असल्याने मुंबईला पाणीपुरवठा कारवारी सर्वच धरणे भरून वाहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईत पाण्याची मागणी दररोज ४२०० दशलश लीटर एवढी असली तरी मुंबईला दररोज ३७५० दशलश लिटर पाणीपुरवठा होतो. दररोज २५ ते ३० टक्के म्हणजे ९०० लिटर पाणी गळती व चोरीमध्ये वाया जात असते. अपु-या पावसाने २०१५ मध्ये मुंबईत पाणी कपात करण्यात आली होती. त्यावेळी मुंबईकरांना वर्षभर पाणीकपातीचा सामना करावा लागला होता. परंतु गेल्यावर्षी तलाव परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे पाण्याची समस्या निर्माण झाली नव्हती.
१६ जुलै २०१७ ला पाण्याची स्थिती
धरणाचे नाव पाणी साठा (दशलक्ष लिटर)
अप्पर वैतरणा ९६२९०
मोडक १२८९२५
तानसा १४५०८०
मध्य वैतर १९३५३०
भातसा ७१७०३७
विहार २७६९८
तुलसी ८०४६
एकूण ९४८३३५