मुंबई / प्रतिनिधी - मुंबई उपनगरातील कुरार पोलीस ठाणे हद्दीतील क्षेत्रात वाढत्या गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण आणण्यासाठी सी. सी.टि.व्ही. कॅमेरे बसवावेत अशी मागणी आमदार सुनील प्रभु यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुंबई उपनगरातील, मालाड (पूर्व), कुरार पोलीस ठाणे क्षेत्र, हे दिंडोशी विधानसभा क्षेत्रात येते. या ठिकाणी मोठया प्रमाणात झोपडया आहेत. दाट वस्तीमुळे, अनेक गल्ली व नाके अस्तित्वात आहे. गल्ली व रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहनांची सतत वर्दळ तसेच स्थानिक नागरीकांची रहदारी मोठया प्रमाणात असल्याने, या भागात चो-या, दरोडयांची प्रमाण वाढले आहे. त्याचा त्रास स्थानिक जनतेस होत असून, त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी, ज्या ठिकाणी सी.सी.टि.व्ही. कॅमेरे बसविले आहेत. त्या ठिकाणी गुन्हेगारास पकडण्यास मदत झाली असून, गुन्हेगारीचे प्रमाण देखील कमी झाले आहेत. परंतू आजही अनेक ठिकाणी विभागात सी.सी.टि.व्ही. कॅमेरे नसल्याने गुन्हेगारांचे फावते आहे. यामुळे ज्या ठिकाणी सी.सी.टि.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले नाहीत त्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात यावेत, तसेच ज्या ठिकाणी सी.सी.टि.व्ही. कॅमेरे बसविलेले आहेत त्या ठिकाणच्या कॅमे-यांच्या संख्येत वाढ करावी जेणे करून वाढत्या गुन्हेगारी कारवायावर नियंत्रण आणण्यासाठी मदत होईल असे सुनील प्रभु यांनी म्हटले आहे.