मुंबई / प्रतिनिधी - मुंबई विद्यापीठाचे तृतीय वर्षाचे निकाल रखडल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणावर पाणी सोडावे लागले आहे. याला अकार्यक्षम शिक्षणमंत्री आणि कुलगुरू जबाबदार असल्याने शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांचे तातडीने राजीनामे घ्या अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे केली. मुंबई विद्यापीठातील रखडलेले निकाल व इतर प्रश्नावर सोमवारी सकाळी आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली. या भेटी दरम्यान त्यांनी हि मागणी केली.
मुंबई विद्यापीठाचे जून-जुलैमध्ये जाहीर होणारे तृतीय वर्षाचे निकाल यावर्षी ऑगस्ट तोंडावर आला तरी जाहीर झालेले नाहीत. असे असले तरी मुंबई विद्यापीठाव्यतिरिक्त सर्व विद्यापीठांची पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची संधी हुकणार आहे. याला सर्वस्वी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांचा ऑनलाइन असेसमेंटचा अट्टहासच कारणीभूत असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. ऑनलाइन असेसमेंटसाठी तब्बल चार दिवस कॉलेज बंद ठेवण्याची आलेली नामुष्की म्हणजे विद्यापीठाच्या इतिहासातील दुर्दैवी घटना असल्याचेही ते म्हणाले. राज्यातील शिक्षणाची अवस्थाही अशीच बिकट झाली आहे. त्यामुळे या अवस्थेला जबाबदार असलेले शिक्षणमंत्री आणि कुलगुरू यांचा राजीनामा घ्यावा अशा मागणीचे निवेदन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांना दिले. मुंबई विद्यापीठाने घाईघाईने निविदा मागवून ऑनलाइन असेसमेंटसाठी खासगी कंपनीला कंत्राट दिले आहे. त्यामुळे यामध्ये कोणत्या पात्रता ग्राह्य धरल्या, कोणत्या निकषांवर या कंपनीची निवड केली हे स्पष्ट होणे गरजेचे असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. असेसमेंटचे काम देण्याच्या प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करीत या प्रकाराची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी विभागप्रमुख आमदार अॅड. अनिल परब, माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे, नगरसेवक अमेय घोले उपस्थित होते.