मुंबई - अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना आणि अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या आदिवासी क्षेत्रांतर्गत किंवा क्षेत्राबाहेरील उपयोजना याअंतर्गत ठिबक सिंचनासाठी ५० हजार आणि तुषार सिंचनासाठी २५ हजाराच्या मर्यादेत एकूण ९० टक्के अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेसंदर्भात कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने घेतलेल्या निर्णयांना आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. आजच्या निर्णयानुसार देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानास पूरक अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. अनुसूचित जाती, नवबौद्ध आणि अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना ९० टक्क्यांच्या मर्यादेत अनुदान दिले जाईल.
अनुसूचित जाती, नवबौद्ध आणि अनुसूचित जमाती शेतकऱ्यांची प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत निवड न झालेल्या शेतकऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना किंवा आदिवासी उपयोजनेंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठी अर्ज केल्यास त्यांना एकूण खर्चाच्या ९०टक्के किंवा ठिबक सिंचनासाठी ५० हजार आणि तुषार सिंचनासाठी २५ हजार यापैकी कमी असलेल्या रकमेचे अनुदान देण्यात येईल. अनुसूचित जाती, जमातीच्या लाभार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वालंबन योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानास पूरक अनुदान देण्यासाठी अवलंबावयाची सविस्तर कार्यपद्धती कृषि आयुक्तालयाकडून निश्चित करण्यात येईल. कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत एकूण खर्चाच्या टक्केवारीवर आधारित अनुदानाची पद्धत कायम ठेवण्यात येईल.