मुंबई, दि. 4 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना एसएसबी या परिक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतींसाठी दिनांक 25 जुलै ते 03 ऑगस्ट 2017 या कालावधीत एस.एस.बी.कोर्स क्र.43 कोर्सचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन व प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आलेली आहे.
इच्छूक व पात्र उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी घेण्यासाठी दि.20 जुलै 2017 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्याआधी पीसीटीसी ट्रेनिंगच्या गुगल प्लस पेज वरती किंवा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांची वेबसाईट www.mahasainik.com वरील रिक्रुटमेंट टॅब (Recruitment Tab) ला क्लीक करुन त्यामधील उपलब्ध चेक लिस्ट (Check List) आणि महत्त्वाच्या तारखा यांचे अवलोकन करुन त्याची दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून तसेच त्यामध्ये दिलेले सर्व परिशिष्ट डाउन लोड करुन त्यांचीही दोन प्रतीमध्ये प्रिंट काढुन ते पुर्ण भरुन आणणे आवश्यक आहे. तसेच एस.एस.बी. प्रवेश वर्गसाठीची खालील प्रमाणे कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व ह्या संबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना घेऊन येणे आवश्यक आहे.
कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हीसेस परीक्षा (UPSC) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी परीक्षा (UPSC) पास झालेली असावी. व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी (सी) सर्टिफिकेट अे/बी ग्रेड मध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. युनिव्हर्सिटी एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे. अथवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय, परिसर, नाशिकरोड, नाशिक यांचा दूरध्वनी क्र.0253-2451031/32 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर, जुने जकात घर, फोर्ट, मुंबई यांनी कळविले आहे.