मुंबई, दि. 26 : गेट वे ऑफ इंडिया व भाऊचा धक्का येथील प्रवासी वाहतुकीच्या बोटींची प्रवासी वाहतूक क्षमता निश्चित केली आहे. तसेच या प्रवासी बोटींची प्रवासी संख्या, सुरक्षिततेची साधने यांची महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डामार्फत तसेच संबंधित बंदर निरीक्षक यांच्या मार्फत वेळोवेळी अचानक तपासणी करण्यात येत असल्याची माहिती बंदरे विभागाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधान परिषदेत दिली.
मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया व भाऊचा धक्का येथून प्रवासी वाहतुकीसाठी असलेल्या बोटी जुनाट व गळक्या असल्यासंदर्भात सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना चव्हाण बोलत होते.
राज्यातील जलवाहतुकीला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा व अलिबाग या जलमार्गावर प्रवासी वाहतूक सुरु करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत खाजगी जलवाहतूक संस्थांना परवाने देण्यात आले आहेत. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून रायगड जिल्ह्यातील मांडवा तालुका अलिबाग आणि घारपुरी (एलिफंटा) (ता.उरण) येथे प्रवासी बोटीव्दारे जलवाहतूक करण्यात येते. या बोटींची तपासणी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे सागरी अभियंता व मुख्य सर्वेअर यांच्या मार्फत करण्यात येऊन दरवर्षी सर्वे करण्यात येतो. तसेच परवाने दिलेल्या बोटींची प्रादेशिक बंदर अधिकारी व संबंधित बंदर निरीक्षकांमार्फत अचानक तपासणी केली जाते. या नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध इनलँड व्हेसल्स ॲक्टनुसार कारवाई करण्यात येते. तसेच भाऊचा धक्का ते मोरा या मार्गावर पावसाळी हंगामामध्ये प्रवासी क्षमता कमी करण्याचे मेरिटाईम बोर्डामार्फत कळविण्यात येते. त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी या काळातच हंगामी दरवाढ करण्यास व्यावसायिकांना परवानगी दिली जाते.असेही चव्हाण यांनी सांगितले. या लक्षवेधीत सदस्य भाई गिरकर, संजय दत्त, विद्या चव्हाण, जयंत पाटील, आदींनी सहभाग घेतला.