मुंबई / प्रतिनिधी - रेड एफएम वाहिनीच्या रेडिओ जॉकी मलिष्का हिने "मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाही काय" हे गाणे गायले आहे. या गाण्यामधून मलिष्का हिने महापालिकेचे कारभाराचे वाभाडे काढले आहे. मलिष्काने केलेल्या टिकेने पालिका प्रशासनाच्या कारभाराचे धिंडवडे निघाल्याने सत्ताधारी शिवसेना मलिष्कावर सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप पालिकेच्या स्थायी समितीत सर्व पसखीय सदस्यांनी केला आहे. यानंतर आता मलिष्का विरोधात सुडबुद्धीने कारवाई करु नये, अशी लेखी मागणी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक रवी राजा यांनी आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. पालिका प्रशासनाने हे प्रकरण फार गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही, असेही रवी राजा यांनी म्हटले आहे.
मलिष्काच्या ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय ?’ या गाण्याला मुंबईकर नागरिकांकडून व सोशल मीडियावर तुफान प्रसिद्धी मिळत आहे. मलिष्काने गायलेले हे गाणे पालिकेतील सत्ताधारी शिवसनेच्या जिव्हारी लागले आहे. मलिष्काच्या या गाण्यामुळे महापालिकेची बदनामी झाल्याने रेड एफएमवर व मलिष्कावर कायदेशीर कारवाई करावी तसेच त्यांच्यावर ५०० कोटींचा दावा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर व अमेय घोले यांनी आज पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात समाधान सरवणकर यांनी पालिका आयुक्ताना पत्रही दिले आहे. याच दरम्यान पालिका अधिकाऱ्यांनी मलिष्काच्या आईच्या घरी पाहणी करून घरात डेंग्यूच्या आल्या सापडल्या प्रकरणी नोटीस दिली आहे. पालिकेने मलिष्काच्या आईला डेंगू प्रकरणी दिलेल्या नोटीसीचा मुद्दा स्थायी समितीत चांगलाच गाजला आहे. स्थायी समितीत काँग्रेस, राष्टवादी, भाजपाच्या सदस्यांनी केला. समाजवादी पक्षाने शिवसेनेने हे प्रकरण आपल्यावर ओढवून घेतले असून सेनेकडून मलिष्कावर सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान या गीतामधून मुंबई महापालिकेची कोणतीही बदनामी केली नसून, मलिष्काने मुंबईची सद्यस्थिती मुंबईकरांच्या समोेर मांडली आहे. तसेच तिच्या घरात डेंग्यू पसरवणाऱ्या डासाच्या आळ्या सापडल्याबद्दल किटकनाशक खात्याकडून मलिष्काच्या आईला नोटीस पाठवली आहे. यामुळे पालिकेने हे प्रकरण फार गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही व तिच्याविरोधात सुडबुद्धीने कारवाई करु नये, अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे.