मुंबई / प्रतिनिधी - मुंबईत बदलत्या हवामानामुळे मलेरिया, डेंग्यू सारख्या साथीच्या रोगांचे प्रमाण वाढू लागले आहे. स्वाईन फ्ल्यूचाही फैलाव वाढत आहे. या रोगांवर ठोस उपायोजना करण्यास पालिकेचे आरोग्य खाते अपयशी ठरले आहे. परिणामी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचा मृत्यू होत, असा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सभागृहात एका निवेदनाद्वारे केला. यावर पालिकेचे आरोग्य खाते उत्तम काम करत असल्याचे प्रमाणपत्र देवून शिवसेनेने आरोग्य विभागाची पाठराखण केल्याने संतापलेल्या विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेत वातावरण तापवले होते.
साथीच्या रोगांना प्रतिबंध करणे पालिकेचे बंधनकारक कर्तव्य आहे. लेप्टो, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू आदी रोगांचे प्रमाण वाढत आहे. आरोग्य खात्यावर कोट्यावधी रुपये खर्च करूनही साथीच्या आजाराने मृतांची संख्या वाढत आहे. प्रत्येक विभागात वैद्यकीय पथके नेमून साथीचे रोग अटोक्यात आणा अशी मागणी करून या रोगांवर नियंत्रण आणण्याबाबत प्रशासन उदासिन असल्याचा ठपका पालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी ठेवला. पालिका आणि राज्य सरकार यांनी या रोगांविषयी व्यापक स्वरूपात जनजागृती करावी अशी मागणीही त्यांनी केली. त्याला विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसची नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर उपचार कसा करावा, यांची माहितीच नसल्याचे सांगितले. रुग्णसंख्या वाढत असताना रुग्णांची हळसांड होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नगरसेवक कमलेश यादव आणि त्यांची मुलगी स्वाईन फ्लूने आजारी असल्याची बाब सभागृहात मांडली. तसेच पावसाळा सुरू होताच स्वाईन फ्लूचे प्रमाण वाढणार हे प्रशासनाला माहित असूनही त्यावर उपायोजना का केल्या नाहीत असा प्रश्न त्यांनी केला. यावेळी विरोधी पक्षाच्या सर्वच नगरसेवकांनी प्रशासनाचा जोरदार समाचार घेतला. दरम्यान, आयुुक्त काय उपायोजना केल्या आहेत याची आकडेवारी देत असताना नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ घातला. या गोंधळात सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी प्रशासन चांगले काम करीत असल्याचे प्रमाणपत्र दिले. त्यामुळे विरोधक अधिकच संतप्त झाल्याने वातावरण चांगलेच तापले होते.