राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राज्यातील २८८ सदस्य मतदान करणार, राज्याचे मत मूल्य ५० हजार ४०० - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 July 2017

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राज्यातील २८८ सदस्य मतदान करणार, राज्याचे मत मूल्य ५० हजार ४००


मुंबई, दि. ३ : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राज्यातील विधानसभेचे २८८सदस्य मतदान करण्यास पात्र आहेत. प्रत्येक सदस्याचे मतमूल्य १७५ इतके असून, ५० हजार ४०० एवढे महाराष्ट्राचे मत मूल्य असणार आहे. अशी माहिती राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी राज्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा विधीमंडळ प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी दिली. 

१७ जुलै २०१७ रोजी दिल्ली येथील मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रीयेबाबत डॉ.कळसे यांनी माहिती दिली. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निर्वाचन अधिनियमानुसार राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. एकूण ३१ राज्यांचे ४१२० विधानसभा सदस्य बॅलेट पेपर पद्धतीने आपला मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहितीही डॉ. कळसे यांनी यावेळी दिली.

अधिक माहिती देताना ते म्हणाले की, १९७१ च्या जनगणनेप्रमाणे राज्यातून २८८ सदस्य मतदानास पात्र असून, प्रत्येकाचे मतमूल्य १७५ इतके आहे. एकूण महाराष्ट्राचे मतमूल्य ५० हजार ४०० इतके आहे. देशातून एकूण ४१२० आमदार आणि ७७६ खासदार म्हणजेच एकूण ४ हजार ८९६ सदस्य मतदान करण्यास पात्र आहेत. एकूण सदस्यांचे १० लाख ९८ हजार ९०३ एवढे मतमूल्य असणार आहे. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे डॉ. कळसे यांनी सांगितले.

Post Bottom Ad