मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये भरती होणाऱ्या गरोदर महिलांना आणि प्रसुती नंतर जन्माला येणाऱ्या बाळांना चांगली सुविधा मिळत नसल्याने हि प्रसूतिगृहे अद्ययावत करण्याची मागणी शिवसेनेच्या नगरसेविका राजुल पटेल यांनी महिला व बाल विकास समितीच्या बैठकीत केली आहे.
महिला व बाल विकास समितीच्या बैठकीत गोराई येथे १५ ते २० हजाराची लोकवस्ती आहे. या ठिकाणच्या लोकांना प्रसूतिगृहाची सोय नसल्याने गरोदर महिलांना बोटीतून खाडी पलीकडे आणताना किंवा बसमधून इतर लांबच्या रुग्णालयात जाताना प्रसूती होत असते. गोराई हे ठिकाण खाडी पलीकडे असले तरी येथील नागरिक पालिकेचे करदाते आहेत. यामुळे या ठिकाणच्या महिलांना प्रसूतिगृहाची सोया करावी अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेविका श्वेता कोरगावकर यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली होती. या विषयावर बोलताना महापालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये फक्त नॉर्मल प्रसुती केली जाते. एखाद्यावेळी प्रसुती करताना काही पेच निर्माण झाल्यास रुग्णांना पालिकेच्या इतर मोठ्या रुग्नालयात पाठवले जाते. प्रसुतीगृहांमध्ये कलर डॉप्लर, सोनोग्राफी यासारख्या सुविधा नाहीत. गरोदर महिलांना रक्त तपासणी करावयाची असल्यास त्याचीही सोय नसल्याने मोठ्या रुग्णालयात रक्त तपासणी करायला जावे लागते. प्रसुतीग्रहात जन्मलेल्या बाळांसाठी इन्क्युबिलेटरअसली तरी वेंटीलेटरची सोय नाही. पालिकेच्या प्रसूतिगृहात जन्मलेल्या बाळांना पालिकेच्या इतर रुग्णालयात दाखल करून घेतले जात नाही. यामुळे पालिकेच्या प्रसूतिगृहे अद्ययावत करावी अशी मागणी राजुल पटेल यांनी केली. यावर प्रशासनाने पालिकेची सर्व प्रसूतिगृहे अद्ययावत असल्याचा खुलासा करत गोराई येथील नागरीकांच्या सुविधेसाठी लवकरच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर प्रसूतिगृह उभारले जाईल अशी माहिती दिली.