मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या शाळा व खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहार पुरविण्याचे कंत्राट बंगलोरच्या अक्षयपात्र संस्थेला देण्याचा घाट महापालिकेकडून घातला गेला आहे. त्यासाठी ३०० कोटी किमतीचा भूखंड या संस्थेला दिला जाणार आहे, पालिकेतील या निर्णयाचा मुंबईतील महिला बचतगट व संस्थांच्या फेडरेशनद्वारे तीव्र विरोध केला आहे. बंगलोरच्या बदनाम असलेल्या अक्षयपात्र या संस्थेला कंत्राट दिल्यास सर्व महिला संस्था व बचत गट रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. वेळ पडल्यास मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांचीही भेट घेऊ. त्यांच्याकडूनही न्याय न मिळाल्यास न्यायालयात जाऊ असा इशारा महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेच्या जयश्री पांचाळ यांनी दिला आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बंगलोरची अक्षयपात्र संस्था हि एक बदनाम संस्था असून त्यांच्या आहारातून अनेकदा विषबाधा झाली आहे, शिजवलेल्या डाळींमध्ये उंदीर व पाली आढळलेल्या आहेत, तसेच अक्षयपात्र संस्थेने शालेय आहारासाठी सरकारकडून अनुदान हि लाटले आहे. या संस्थेने देश परदेशातून कंपन्यांकडून बेकायदेशीर रित्या देणग्याही गोळा केल्या आहेत, त्यामुळे मुंबईतील कलीना येथील मोक्याच्या जागेवरील ३०० कोटींचा ३० हजार चौरस मीटरच्या भूखंडावर डोळा ठेऊनच या संस्थेने पालिका विद्यार्थ्यांसाठी मोफत आहार पुरविण्याचे मान्य केले आहे असा आरोप पांचाळ यांनी केला आहे.
त्या पुढे म्हणाल्या कि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने २००२ साली मुंबईतील महिला बचत गटांना पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन देण्याचे काम मिळाले होते. सध्या मुंबईतील ४५० महिला संस्था हे काम करीत असून जवळपस ७ हजार महिला या कामाशी जोडल्या गेल्या आहेत. आज प्रत्येक विद्यार्थ्यामागे ४ रुपये १३ पैसे ते ६ रुपये १८ पैसे इतके अनुदान आहे. या कामाची बिले अनेकदा महिनो महिने मिळत नसल्याने अनेक महिलांनी वयक्तिक कर्जे काढून, दागिने गहाण ठेवून दर्जेदार पोषण आहार सुरूच ठेवला आहे असे पांचाळ यांनी सांगितले. बदनाम असलेल्या अक्षयपात्र संस्थेस हे कंत्राट देण्याचे कारणंच काय असा प्रश्न पांचाळ यांनी उपस्थित केला आहे.
आंदोलन करणाऱ्या संस्थांची चौकशी -
प्रजाच्या अहवालानुसार मुंबईत ३५ मुले कुपोषित आढळली आहेत. मुंबई सारख्या शहरात कुपोसजीत बालके सापडणे योग्य नाही. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना चांगला सकस आहार मिळावा म्हणून या संस्थेला काम देण्यात आले आहे. सुरुवातीला हि संस्था ५ हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवेल, नंतर ५० हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार हि संस्था पुरवणार आहे. यामुळे किचनची व्यवस्था करण्यासाठी जागा देण्यात आला आहे. महिला बचत गट पोषक आहार देत होते मग पालिका शाळांमध्ये कुपोषित मुले कशी आढळली याचे उत्तर द्यावे लागेल. अश्या संघटना आंदोलन करून विरोध करणार असतील तर त्यांची चौकशी करावी लागेल.
विश्वनाथ महाडेश्वर - महापौर, मुंबई