नियंत्रण कक्षाला माहिती मिळावी म्हणून पोलिसांच्या वाहनांमध्ये नोटपॅड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 July 2017

नियंत्रण कक्षाला माहिती मिळावी म्हणून पोलिसांच्या वाहनांमध्ये नोटपॅड


मुंबई - शहरात एखादी अनुचित घटना घडली, तर त्याची सचित्र माहिती वरिष्ठांना व नियंत्रण कक्षाला मिळावी म्हणून पोलिसांच्या गस्ती व्हॅनमध्ये नोटपॅड बसवले जात आहेत. या नोटपॅडच्या माध्यमातून घटनास्थळाचे फोटो नियंत्रण कक्षाला पाठविण्याचा प्रयोग सुरू आहे. ‘मोबाईल डेटा टर्मिनल’ नावाचा उपक्रम मुंबई पोलिस सुरू करत आहेत. पोलिसांच्या गस्ती वाहनांमध्ये नोटपॅड बसवले जाणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर असा उपक्रम दक्षिण प्रादेशिक विभागात सुरू करण्यात आला आहे.


२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर गृहविभागाने पोलिस दलाच्या आधुनिकीकरणावर भर दिला. पोलिसांसाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि वाहनांची खरेदी केली. शहर सुरक्षित राहण्यासाठी सीसी टीव्ही कॅमेऱ्याचे जाळे पसरवले. सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पोलिस शहरातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असतात. दत्ता पडसलगीकर यांनी मुंबई पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर विविध उपक्रम हाती घेतले आहेत. शहरवासीयांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी ‘इमर्जन्सी रिस्पॉन्ड मोबाईल सर्व्हिलन्स कंट्रोल कमांड सेंटर’ सुरू केले. काही अनुचित घटना घडल्यावर कमांड सेंटरचे वाहन घटनास्थळी जाते. त्यानंतर तेथील माहिती काही वेळातच पोलिस नियंत्रण कक्षाला मिळते. त्यावर न थांबता भविष्यातील सुरक्षेचा विचार करून पोलिसांच्या गस्ती वाहनामध्ये ‘मोबाईल डाटा टर्मिनल’ बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीपीएस यंत्रणेच्या माध्यमातून डाटा टर्मिनल जोडण्यात येईल. हा सीसी टीव्ही प्रकल्पाचाच एक भाग आहे. प्रायोगिक तत्त्वावर दक्षिण प्रादेशिक विभागातल्या काही पोलिस ठाण्यांतील वाहनांमध्ये ही यंत्रणा बसवण्यात येत आहे. डाटा टर्मिनलच्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण मुंबईतील पोलिसांच्या गस्ती वाहनांमध्ये टप्प्याटप्प्याने ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे.

Post Bottom Ad