मोडक सागर, तानसा पाठोपाठ तुलसी धरणही भरण्याच्या मार्गावर -
मुंबई / प्रतिनिधी - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात गेले महिनाभर चांगला पाऊस पडत असल्याने २३ जुलै पर्यंत १२ लाख २५ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा असल्याने मुंबईकर नागरिकांचे वर्षभराचे पाण्याचे टेन्शन मिटले आहे. त्यातच मोडक सागर व तानसा हि दोन धरणे भरली आहेत. त्यापाठेपाठ आता तुलसी धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. सोमवार किंवा मंगळवारी हे धरण भरून वाहू लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईला वर्षभर चांगला पाणी पुरवठा होण्यासाठी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणामध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार ३६३ दश लश लिटर पाणीसाठा असणे अवाश्यक आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी सर्व धरणे भरल्यास १४ लक्ष ४७ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा होतो. हे पाणी वर्षभर सव्वा कोटी मुंबईकर नागरिकांना वर्षभर पुरवले जाते. एखाद्या वेळेस पाऊस कमी पडला तरी १२ लाख ५० हजार दशलक्ष इतका पाणीसाठा असला तरी नागरिकांना थोडीशी काटकसर करत वर्षभर पाणी पुरवठा करता येऊ शकतो. धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने पावसाचे ऑगस्ट व संप्टेंबर हे दोन महिने पावसाचे बाकी आहेत. यामुळे सातही धरणे सप्टेंबर अखेर पर्यंत भरून ओसंडून वाहणार आहेत.
मोडक सागर धरण भरल्याने १८ जुलैला सकाळी ६.३२ वाजता धरणाचे दोन गेट उघडण्यात आले होते. या धरणातून मुंबईला दररोज ४५५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. मोडक सागर पाठोपाठ तानसा धरणही १८ जुलैला सायंकाळी ४.५५ वाजता ओसंडून वाहू लागला. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तुलसी हे धरण सुद्धा ओसंडून वाहू लागण्याच्या मार्गावर आहे. तुलसी धरणात पाणी साठवण्याची क्षमता १३९.१७ मिटर असून २३ जुलैच्या सकाळ पर्यंत १३८.८१ मिटर इतका पाणीसाठा आहे. यामुळे असाच पाऊस पडत राहिल्यास सोमवारी तुलसी धरण ओसंडून वाहू लागेल. २३ जुलैच्या पहाटेच्या ६ वाजताच्या पाण्याच्या अहवालाप्रमाणे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये १२ लाख २५ हजार ८६६ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीपुरवठा मुंबईकरांना ३२६ दिवस पुरेल इतका आहे.
२३ जुलै २०१७ ला पाण्याची स्थिती
धरणाचे नाव तलावातील साठा (दशलक्ष लिटर)
अप्पर वैतरणा १५४६३४
मोडक १२८९२५
तानसा १४४४७५
मध्य वैतरणा १७६५७७
भातसा ५९५०९२
विहार १८६१०
तुलसी ७५५३
एकूण १२२५८६६
एकूण १२२५८६६