मुंबई / प्रतिनिधी - महागाई प्रचंड वाढल्याने मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचे मानधन २५ हजार रुपये करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. तसा प्रस्ताव पालिकेत मंजूर करून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. राज्य सरकारने नगरसेवकांचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच्या मानधनाच्या तुलनेत ही वाढ १०० ते १५० टक्क्य़ांपर्यंत आहे.
मुंबई महापालिकेतील नगरसेवकांच्या मानधनात २००८ मध्ये तर इतर महापालिकांच्या नगरसेवकांच्या मानधनात २०१० मध्ये वाढ करण्यात आली होती. महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या मानधनात दूरध्वनी, लेखनसामग्री, टपाल आदी खर्चाचा समावेश असल्याने व महागाई प्रचंड वाढल्याने मानधन वाढविण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत होती. मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना दहा हजार रुपये इतके मानधन देण्यात येत होते. २०१२ मध्ये महापालिका प्रशासनाने नगरसेवकांचे मानधन २५ हजार रुपये करण्यात यावे अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. यावर राज्य शासनाने कोणताही निर्णय घेतला नव्हता. दरम्यानच्या काळात सरकारने आमदारांच्या मानधनात दुप्पट केले तर केंद्र सरकारने खासदारांचेही मानधन वाढविले. या पाश्र्वभूमीवर नगरसेवकांच्याही मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी मागणी जोर धरू लागली होती.
मुंबई महानगरपालिकेतील समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनीही जून महिन्यात नगरसेवकांचे मानधन ५० हजार रुपये इतके करण्यात यावे अशी मागणी करणारे पत्र सरकारला लिहिले होते. यामुळे आता राज्यातील सर्व महापालिकांमधील नगरसेवकांच्या मानधनात घसघशीत वाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईसह ‘अ+’ महापालिकांमधील नगरसेवकांना दरमहा २५ हजार रुपये, ‘अ’ वर्ग महापलिकेतील नगरसेवकांना २० हजार रुपये, ‘ब’ वर्ग महापालिकेतील नागरसेवकांना १५ हजार तर ‘क’ वर्ग महापालिकेतील नागरसेवकांना १० हजार रुपये इतके मानधन दरमहा दिले जाणार आहे. मानधन वाढीचा फायदा राज्यातील २४ महानगरपालिकेतील नगरसेवकांना मिळणार आहे.