मुंबई, दि. २६ : वस्तू आणि सेवा कर प्रणालीमुळे स्टेनलेस्टील उद्योगाला भेडसावणारे प्रश्न जे कायद्याच्या चौकटीत राहून सोडवता येतील ते सोडवण्याचा अर्थमंत्री म्हणून आपण नक्की प्रयत्न करू, असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
आज स्टेनलेस्टील स्टील मर्चंट असोसिएशनच्या ६० व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार मितेश भागंडिया यांच्यासह अतुल शहा, जिंदाल उद्योग समूहाचे अभ्युदय जिंदाल आणि स्टेनलेस स्टील मर्चंट असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
स्टेनलेस स्टील उद्योगाचा थेट संबंध किचन अर्थात स्वयंपाक घराशी येत असल्याने घराघरात समृद्धीचा आनंद देणारा हा उद्योग आहे असे सांगून मुनगंटीवार म्हणाले, या व्यवसायाला असणारी स्थानिक बाजारपेठच खूप मोठी आहे. असोसिएशनची मागणी लक्षात घेऊन चमचांवरील जीएसटी दर १२ टक्क्यांवर आणल्याचेही त्यांनी सांगितले.
आज कारगिल विजय दिनानिमित्ताने त्यांनी देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचे आभार मानले तर या युद्धात ज्या सैनिकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली त्या शहीद जवानांना मुनगंटीवार यांनी यावेळी आदरांजली वाहिली.