मुंबई दि.24 - राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत आणि डोमीसाईल प्रमाणपत्र सादर करण्यात मोठा घोटाळा झाला असुन या घोटाळ्याची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी केली आहे. याबाबत, सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागुन त्याचा अंतिम निकाल येत नाही, तोपर्यंत सदर प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश मिळण्यासाठी परराज्यातील विद्यार्थ्यांनी सादर केलेली डोमीसाईल प्रमाणपत्र खोटी, बोगस आणि लाखो रूपये देऊन मिळविली आहेत, हा व्यापम पेक्षाही मोठा घोटाळा असल्याचा आरोप करून अशा प्रमाणपत्रांमुळे राज्यातील 50 हजार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबतचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घोटाळ्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसणार असल्याने वैद्यकीय शिक्षण विभागाने यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठाने केलेल्या निर्णयास मा.सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यावे व त्याचा अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत, सदर प्रवेश प्रक्रिया स्थगित ठेवावी, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे. याबाबत मुंबईतील असंख्य विद्यार्थी आणि पालकांनी मुंडे यांची भेट घेतल्यांनतर याबाबत त्यांनी वैद्यकीय शिक्षण सचिवांशी संपर्क साधला तसेच याबाबत मुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना पत्रही पाठविले आहे.