मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 July 2017

मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या


नवी दिल्ली - पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन केली.

मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे ही मागणी रिपाइंतर्फे आपण मागील 12 वर्षांपासून करीत आहोत. मुंबई सेंट्रल हे मुंबईतील एक प्रमुख टर्मिनस आहे. मुंबईतील मध्य रेल्वेचे व्हिटी स्टेशनला आणि मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे. त्याचे आम्ही स्वागत केले आहे. त्याचप्रमाणे मुंबई सेंट्रल टर्मिनसचेही नाव डॉ बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस करण्यात यावे. मुंबईत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर वास्तव्यास होते. मुंबईतील महाविद्यालयात अध्यापनाचे काम ही त्यांनी केले. त्याकाळात अनेकदा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस येथून प्रवास ही केला त्यावेळी तेथे ते काही वेळ थांबत असत असे आठवले यांनी सुरेश प्रभू यांच्या निदर्शनास आणले आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनसला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याबाबत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्याचे आठवले यांनी सांगितले. 

Post Bottom Ad