मुंबई - राज्यपाल विद्यासागर राव यांनी मुंबई विद्यापीठातील रखडलेल्या निकालांची गंभीर दखल घेतली आहे. रखडलेले सर्व निकाल ३१ जुलैपर्यंत लावा असे निर्देश राव यांनी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना दिले आहेत. तसेच निकालांच्या सद्यस्थितीचा अहवाल प्रत्येक आठवड्यात आपल्याकडे सादर करा असेही बजावले आहे. तसेच वेळेत निकाल लावण्यासाठी ‘वॉर रूम’ सुरू करा असे आदेशही राव यांनी दिले आहेत.
मुंबई विद्यापीठाने मार्च-एप्रिलमध्ये घेतलेल्या टीवायसह शेकडो परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर केलेले नाहीत. यात पुनर्मूल्यांकनाच्या निकालांचाही समावेश आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग बंद झाला असून अनेकांची प्रमोशनही रखडली आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे कुलपती विद्यासागर राव यांनी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना तातडीने बैठकीसाठी बोलविले. या बैठकीत राज्यपालांनी रखडलेल्या निकालांवरून कुलगुरूंची चांगलीच खरडपट्टी काढल्याची माहिती हाती आली आहे. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सीताराम कुंटे, बीसीयूडी डॉ. अनिल पाटील, कुलसचिव डॉ. एम.ए.खान आणि परीक्षा व मूल्यामापन मंडळाचे संचालक दीपक वसावे आदी उपस्थित होते.
४७७ परीक्षांपैकी फक्त ५१ परीक्षांचे निकाल जाहीर -
विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षा झाल्यापासून किमान ३० दिवसांत तर जास्तीत जास्त ४५ दिवसांत जाहीर होणे अनिवार्य आहे. असे असताना विद्यापीठाने यावर्षी घेतलेल्या ४७७ अभ्यासक्रमांच्या परीक्षांपैकी आतापर्यंत फक्त ५१ परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. जाहीर केलेल्या ५१ निकालांमधील अवघ्या २३ परीक्षांचे निकाल हे ३० दिवसांच्या आत तर १८ परीक्षांचे निकाल हे ४५ दिवसांत जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरित निकाल जाहीर करताना विद्यापीठाने कायदा धाब्यावर बसवला असल्याची चर्चा आहे.