म्हाडा - अनामत रक्कम भरण्याकरिता आता एनईएफटी / आरटीजीएसचा पर्याय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 July 2017

म्हाडा - अनामत रक्कम भरण्याकरिता आता एनईएफटी / आरटीजीएसचा पर्याय


मुंबई, दि. ६ जुलै २०१७ :- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) चा घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने यंदाच्या सदनिका सोडतीकरिता अर्जासोबत उत्पन्न गटानुसार अनामत रक्कम भरण्यासाठी डिमांड ड्राफ्ट (डीडी) व ऑनलाईन पेमेंटसह एनईएफटी (National Electronic Funds Transfer) व आरटीजीएस (Real Time Gross Settlelment) हा पर्यायही अर्जदार नागरिकांच्या सुविधेसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे, अशी माहिती मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी दिली.

म्हाडाने संगणकीय सोडत काढण्यासह अर्जविक्री, अर्ज स्वीकृती हि प्रक्रिया देखील ऑनलाईन केली आहे. या माध्यमातून पारदर्शक, गतिमान कारभाराची प्रचिती नागरिकांना आली आहे. म्हाडा सदनिका सोडतीसाठी अर्ज करतेवेळी अर्जासोबत अत्यल्प उत्पन्न गटातील (EWS) अर्जदारांना रु. १५,०००, अल्प उत्पन्न गटातील (LIG) अर्जदारांना रु. २५,०००, मध्यम उत्पन्न गटातील (MIG) अर्जदारांना रु. ५०,००० व उच्च उत्पन्न गटातील (HIG) अर्जदारांना रु. ७५,००० इतकी विहित अनामत रक्कम (परतावा) भरणे आवश्यक आहे. सदर रक्कम भरण्यासाठी म्हाडातर्फे आतापर्यंत डिमांड ड्राफ्ट (डीडी) व ऑनलाईन पेमेंट असे दोनच पर्याय उपलब्ध होते. यंदाच्या सोडतीपासून सद्यस्थितीत अस्तित्वातील पर्यायांसह एनईएफटी (National Electronic Funds Transfer) व आरटीजीएस (Real Time Gross Settlelment) हे दोन वाढीव पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लाखे म्हणाले, कि एनईएफटी / आरटीजीएस करण्यासाठी अर्ज सादर केल्यावर payment मध्ये गेल्यानंतर एनईएफटी / आरटीजीएस हा पर्याय निवडल्यावर एक चलन तयार होईल. सदरच्या चलनावर एनईएफटी / आरटीजीएस कुठल्या खात्यावर करायचे आहे, बँकेचे व बँकेच्या शाखेचे नाव, आयएफएससी कोड इत्यादी माहिती नमूद केलेली असेल. हे चलन घेऊन अर्जदाराचे खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेत जाऊन एनईएफटी / आरटीजीएसचा त्या बँकेचा विहित अर्ज भरल्यावर उत्पन्न गटाप्रमाणे अनामत रकमेचा भरणा करता येईल. एनईएफटी / आरटीजीएसची रक्कम त्वरित जमा होते. अर्जदाराने एनईएफटी / आरटीजीएस केल्यावर सदरची रक्कम म्हाडाच्या खात्यावर जमा झाली आहे किंवा नाही याबाबत त्याच दिवशी अर्जदाराला माहिती मिळू शकेल.

म्हाडा सोडतीकरिता शहरी भागातून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन अनामत रक्कम भरण्यास प्राधान्य दिले जाते. तर ग्रामीण भागातून डिमांड ड्राफ्ट (डीडी) द्वारे अनामत रक्कम भरण्याचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून डीडी जमा केले जात असल्यामुळे डीडी काढल्यानंतर तो क्लिअर होण्यास सुमारे एक आठवड्याचा कालावधी लागतो. त्यामुळे सोडतीसाठी अंतिम पात्र अर्जदारांची यादी जाहीर करण्यास विलंब होतो, तसेच डीडी काढण्यासाठी अर्जदाराला बँकेला जास्तीचे कमिशनही द्यावे लागते. तसेच डीडीपेक्षा एनईएफटी / आरटीजीएसची प्रक्रिया अधिक सुलभ आहे. वेळ व पैशांची बचत व्हावी म्हणून यंदा एनईएफटी / आरटीजीएस हे दोन नवीन पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सोडतीची प्रक्रिया अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे.

Post Bottom Ad