सुधार समितीत मेट्रोचा प्रस्ताव फेटाळला -
मुंबई / प्रतिनिधी - केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा सरकारचा महत्वकांक्षी असलेला मेट्रो प्रकल्प मुंबईत होऊ घातलं आहे. मुंंबईकरांच्या सोयीसुविधांसाठी आरक्षित असलेले भूखंड कुठल्याही परिस्थिती मेट्रो सारख्या प्रकल्पाला देणार नाही अशी भूमिका शिवसेनेने आज सुधार समितीत मांडली. मेट्रो ३ प्रकल्पाला इलेक्ट्रिक सब स्टेशनसाठी अंधेरी येथील मलनिस्सारण प्रकिया केंद्रासाठी राखीव असलेला ४ हजार चौरस मीटरचा भूखंड देण्याचा प्रस्ताव शिवसेनेने फेटाळून लावला आहे. मुंबई मेट्रोसाठी आरे येथील जागा मेट्रो कंपनीने मागितली होती. हि जागा देण्यास पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने विरोध केला आहे. दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व अशा १८ किमीच्या ‘मेट्रो’ मार्गासाठी उभारण्यात येणार्या इलेक्ट्रिक सब स्टेशनसाठी अंधेरी येथील ४ हजार चौरस मीटरची जागा द्यावी अशी मागणी एमएमआरडीएकडून पालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या बाबतचा प्रस्ताव सुधार समितीत मांडण्यात आला. यावर काँग्रेसचे नगरसेवक अश्रफ आझमी यांनी हि जागा मलनिस्सारण प्रकिया केंद्रासाठी राखीव आहे. हा भूखंड मेट्रोला दिल्यास मुंबईकर जनतेसाठी मलनिस्सारण प्रकिया केंद्र कुठे उभारणार, जो येतो तो पालिकेची जागा मागत आहे मग एमएमआरडीएची जागा का मागितली जात नाही असा प्रश्न उपस्थित करत मुंबईकर नागरिकांच्या भविष्याचा विचार करून हा भूखंड मेट्रोला देऊ नये अशी मागणी आझमी यांनी केली. भाजपचे नगरसेवक प्रकाश गंगाधारे, ज्योती आळवणी, जगदीश ओझा यांनी मेट्रो प्रकल्प कसा चांगला आहे, मेट्रोमुळे ट्राफिकची समस्या मिटणार आहे. लोकांचा वेळ वाचणार असून इंधन बचत होणार आहे. मेट्रोमुळे मुंबईकर नागरिकांना प्रवासासाठी नवा पर्याय उपलब्ध होणार असल्याने मेट्रोला लागतील तितक्या जागा द्या असे आवाहन केले.
कोर्टाने आदेश देऊन सायलेन्स झोनचे निकष घालून दिले असताना ‘मेट्रो’कडून हे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे मिलींद वैद्य यांनी सांगितले. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत सुरू असणार्या ‘मेट्रो’च्या कामामुळे निर्माण होणार्या ध्वनिप्रदुषणामुळे नागरिक, रुग्णांना मनस्ताप होत असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेनेचा विरोध ‘मेट्रो’ला नसून त्यांच्या मनमानी कारभाराला आहे. मेट्रोच्या कामामुळे मुंबईमधील रस्त्यांवर खड्डे पडून रस्त्यांची चाळण झाल्याचे रमाकांत रहाटे यांनी सांगितले. मलनिस्सारण प्रकिया केंद्रासाठी आरक्षित असलेली जागा ‘मेट्रो’ला दिल्यास भविष्यात नागरिकांना मोठ्या संकटांला सामोरे जावे लागेल मग याला जबाबदार कोण असेल असा प्रश्न श्रद्धा जाधव यांनी उपस्थित केला. मुंबईत अनेक ठिकाणी सुरू असलेल्या ‘मेट्रो’च्या कामांमुळे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड्यात पडून नागरिकांना दुखापती होत आहेत. दुकानांसमोर खोदलेल्या खड्ड्यांमुळे दुकानदारांचा धंदा डबघाईला आल्याचे यावेळी शिवसेनेच्या विशाखा राऊत यांनी सांगितले. यावर आमचा मेट्रोला विरोध नाही. नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडांचे आरक्षण बदलून चालणार नाही असे सांगत मेट्रोला भूखंड देण्याचा प्रस्ताव सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांनी नामंजूर केला.