मुंबई / प्रतिनिधी -
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने महापालिकेच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वंकष विकास व्हावा, यासाठी विविध उपक्रम महापालिकेतर्फे राबविण्यात येत आहेत. मुंबईतील सांस्कृतिक वारसा तसेच अन्य बाबींच्या अनुषंगाने सर्वव्यापी विकास साधत असून यात आणखी भर घालण्यासाठी ब्रिटिश कौन्सिलचे भारताचे संचालक अलन गेमेल व पश्चिम भारताच्या ब्रिटिश संचालिका शेरॉन मेमीस यांनी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची सदिच्छा भेट घेतली. शिवाजी पार्क, दादर, महापौर निवासस्थान येथे आज (दिनांक १० जुलै, २०१७) सकाळी मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी ब्रिटिश कौन्सिलच्या संचालिकांची भेट घेतली. यावेळी बृहन्मुंबईच्या सर्वांगिण विकासासाठी महापालिका करीत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. महापालिकेच्या शिक्षण विभागात दृकश्राव्य माध्यम या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. महापालिकेचा विद्यार्थी शिक्षणासोबत विविध व्यक्तिमत्व विकासातही तरबेज होण्यासाठी प्रशासनासोबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे महापौरांनी शिष्टमंडळास सांगितले. यावेळी महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.