मुंबई / प्रतिनिधी - मुंबईत रेल्वेने दरदिवशी ७५ लाख प्रवासी प्रवास करतात, त्यात महिला आणि मुलींची संख्या मोठी आहे. मागच्या दोन आठवड्यांत रेल्वेमध्ये विनयभंगाची तिसरी घटना समोर आली आहे. यामुळे महिला प्रवासी सुरक्षित आहेत का असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. लोकलमध्ये अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस तैनात करण्यात आले आहेत तसेच पोलीस रेल्वे स्थानकांवर महिला डब्याजवळ तैनात करावेत व रेल्वे स्थानकात पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी महिला प्रवाश्यांकडून केली जात आहे.
२९ जून रोजी पहाटेच्या सुमारास सीएसटी स्थानकातून सुटणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसमध्ये एक तरुण एका तरुणीकडे पाहत अश्लील चाळे करत असल्याचा प्रकार उघड झाला होता. ज्यामध्ये मुलींकडे पाहून अश्लील चाळे करण्यात आले आहेत. मागच्याच आठवड्यात एका महाविद्यालयीन तरूणीला बोरिवलीहून चर्चगेटच्या दिशेनं येताना असाच अनुभव आला होता. तिनं त्या तरूणाला हटकलं असता त्या नराधमानं सरळ तिला बलात्कार करण्याची धमकी दिली होती. या दोन्ही प्रकारणांपैकी सीएसटी स्थानकात अश्लील चाले करणाऱ्या अशोक प्रधान याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
हे दोन प्रकार ताजे असतानाच चर्चगेट स्थानकात एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना उघड झाली आहे. चर्चगेट स्टेशनवर एक विद्यार्थिनी लोकलची वाट बघत उभी होती तेवढ्यात तिकडे एक मुलगा आला आणि त्याने तिला आक्षेपार्ह ठिकाणी हात लावून पळ काढला. या मुलानं पळ काढल्यानं काय करावं काही क्षण विद्यार्थिनीला सुचलं नाही, पण दुसऱ्याच क्षणी तिने तातडीनं त्याचा पाठलाग करत त्याला पकडलं आणि इतर प्रवाश्यांनीही तिला मदत केली. या मुलीचा विनयभंग करणाऱ्या या मुलाला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. ही घटना ८ जुलैला घडली असली तरी त्याचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे.
पोलिसांनी याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून मुलाची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. हा मुलगा अल्पवयीन असून त्याचं वय १६ वर्षे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा मुलगा मूळचा मध्य प्रदेशातला असून काळाघोडा परिसरात त्याच्या बहिणीसोबत राहतो अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.