मुंबई / प्रतिनिधी - उद्याने, क्रीडांगणे आणि मनोरंजन मैदाने ही मुंबईकरांची फुफ्फुसे आहेत. त्यामुळे नवीन विकास आराखड्यात या मोकळ्या जागांना धक्का लागू देणार नाही. ‘आरे’मध्ये होत असलेल्या प्रस्तावित मेट्रो कारशेडबाबत शिवसेना कोणतीही तडजोड करणार नाही. सुधार समितीत शिवसेनेची जी भूमिका होती तिचं भूमिका सेनेची आजही आहे. ‘मेट्रो’ कारशेडचा प्रस्ताव सुधार समिती आणि सभागृहाने नामंजूर केला आहे असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले.
मिठागरांवरील जमिनीवर आरक्षणे टाकून तेथे गरीबांसाठी ‘परवडणारी’ घरे उपलब्ध करून देण्याचे प्रशासनाने जाहीर केले होते. ‘परवडणारी’ घरे ही नेमकी संकल्पना काय आहे, हे पहावे लागेल. घरे बांधल्यानंतर त्याची किंमत जर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची असेल तर या योजनेचा उपयोग होणार नाही असे महाडेश्वर म्हणाले. मुंबईचा विकास आराखडा लवकरच सभागृहाच्या मंजुरीनंतर राज्य सरकारच्या नगर विकास खात्याकडे पाठवण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर याची अंमलबजावणी महापालिकेच्या माध्यमातून केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी विकास आराखड्यातील आरक्षणांबाबत शिवसेनेची भूमिका मांडली. शिवसेनेची बांधिलकी ही मुंबईकरांशी आहे. त्यामुळे त्यांच्या हिताबाबत कोणतीही तडजोड शिवसेना करणार नाही असे ते म्हणाले. यावेळी सभागृह नेते यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, सुधार समिती अध्यक्ष अनंत (बाळा) नर, बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ उपस्थित होते.