महापालिकेच्या ललित कला व क्रीडा मंडळाच्या चौकशीचे "आदेश" - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 July 2017

महापालिकेच्या ललित कला व क्रीडा मंडळाच्या चौकशीचे "आदेश"

सत्ताधारी शिवसेनेच्या मागे चौकशीचा ससेमिरा -
मुंबई / प्रतिनिधी -
महापालिकेचे मुलुंड येथील कालिदास नाट्यगृह, तरण तलाव तसेच अंधेरीतील राजे शहाजी क्रीडा संकुलाचा कारभार ललित कला व क्रीडा मंडळाच्या माध्यमातून बघितला जातो. या दोन्ही ठिकाणी खेळापेक्षा व्यापार करण्यावर भर दिला जात असल्याने संस्थेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार भाजपाकडून पालिका आयुक्तांना केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी दिली. ललित कला व क्रीडा मंडळाचा कारभार शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांच्यामार्फत बघितला जात असल्याने पहारेकऱ्यांनी सत्ताधारी शिवसेनेच्या मागे चौकशीचा ससेमिरा सुरु केला असल्याची चर्चा आहे.

ललित कला व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष महापौर विश्वनाथ महाडेश्वर व उपाध्यक्ष हे महापालिका आयुक्त असले तरी मुख्य विश्वस्त हे शिवसेना सचिव आदेश बांदेकर हे आहेत. महापालिकेने मुलुंड येथील कालिदास नाट्यगृह व क्रीडा संकुलाचे नूतनीकरण करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. परंतु या नाटयगृहाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण होऊनही अद्याप त्याचे लोकार्पण करण्यात आलेले नाही. याबाबत ललित कला व क्रीडा मंडळाच्यावतीने कुठलेही प्रयत्न होत नसल्यामुळे नाट्यगृह तसेच तरण तलावाला लाभ नागरिकांना मिळू शकत नाही. याबाबत स्थानिक भाजपाचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी मंडळाचे अध्यक्ष महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे पत्रव्यवहार करूनही त्यांच्याकडून याची दखल घेण्यात आलेली नव्हती त्यामुळे नाट्यगृह आणि तरण तलावाचे त्वरीत लोकार्पण केले जावे, अन्यथा भाजपा ते जनतेसाठी खुले करून देईल, असा इशारा प्रकाश गंगाधरे यांनी दिला होता.

दोन्ही संकुलाची जागा लग्न कार्यालयांसाठी तसेच इतर कामांसाठी भाड्याने देऊन कला व क्रीडा जोपासण्याऐवजी व्यापारीकरण सुरु असल्याचे कोटक यांनी सांगितले. मंडळाला व्यापारीकरणामधून महसूल मिळत असताना कर्मचाऱ्यांना मात्र पगार वेळेत मिळत नसल्याची तक्रार आहे. मंडळामधील ११० पैकी ८५ कर्मचाऱ्यांनी आमच्या सोबत येऊन गैरकारभाराबाबत पालिका आयुक्तांकडे तक्रार केल्याचेही कोटक यांनी सांगितले. या दोन्ही क्रीडा संकुलांच्या व्यवहारात गैरप्रकार सुरु असल्याचा आरोप भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी केला आहे. ललित कला व क्रीडा मंडळाचे सचिव आदेश बांदेकर यांनी मंडळाची अंधेरी आणि मुलुंड येथील क्रीडा संकुले शिवसेनेची संस्थाने बनवली होती. त्यामुळे विश्वस्त मंडळ बरखास्त करून शिवसेनेची ही संस्थाने खालसा करण्याची व हे मंडळ पालिकेने आपल्या ताब्यात घेण्याची मागणी भाजपाने महापालिका आयुक्तांकडे केली होती. याची गंभीर दखल घेत पालिका आयुक्तांनी पालिकेचे उपायुक्त राम धस व सुधीर नाईक यांची चौकशी समिती नेमली आहे. हि समिती या मंडळामधील आर्थिक व इतर गैरव्यवहाराची चौकशी करून पालिका आयुक्तांना अहवाल देणार असून त्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती कोटक यांनी दिली.

Post Bottom Ad