मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महापालिकेत एके काळी मीत्र असलेली शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. पालिकेत जीएसटी नुकसान भरपाईचा चेक वाटप कार्यक्रमात शिवसेना आणि भाजपाच्या नगरसेवकांनी मोदी आणि चोर है चोर है च्या घोषणा देऊन गोंधळ घातला होता. यावेळी भाजपाच्या एका नगरसेवकाला मारहाणही करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपाचे वरिष्ठ नेते मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहाच्या मंगळवारी होणाऱ्या लोकार्पण कार्यक्रमाला एकत्र येणार आहेत. यामुळे या नाट्यगृहाच्या लोकार्पण कार्यक्रमास दोन्ही पक्षाकडून नाट्यमय प्रयोगाने लोकार्पण होणार का याकडे मुंबईकर जनतेचे लक्ष लागले आहे.
मुलुंड (पश्चिम) येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘ महाकवी कालीदास नाटयमंदिर’ चा लोकार्पण समारंभ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तसेच शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, मराठी भाषा व मुंबई उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे, उद्योगमंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री रामदास कदम या विशेष अतिथीच्या उपस्थितीत व मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली उद्या मंगळवार, दिनांक १८ जुलै, २०१७ रोजी, दुपारी १२. ०० वाजता महाकवी कालीदास नाटयमंदिर,प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल, मुलुंड (पश्चिम), मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभास उप महापौर हेमांगी वरळीकर, महापालिका आयुक्त अजोय मेहता, सभागृह नेता श्री.यशवंत जाधव, विरोधी पक्ष नेता रवि राजा, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर, स्थानिक खासदार किरीट सोमय्या, स्थानिक आमदार सरदार तारासिंह, भाजप गटनेते मनोज कोटक, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, सुधार समितीचे अध्यक्ष अनंत नर, एस व टी प्रभाग समिती अध्यक्ष तथा स्थानिक नगरसेविका समिता कांबळे, बाजार व उद्यान समिती अध्यक्ष सान्वी तांडेल हे मान्यवर उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन उप आयुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) डॉ. किशोर क्षीरसागर यांनी केले आहे. या कामाला दिनांक १५ मार्च, २०१६ रोजी प्रारंभ होऊन अल्प कालावधीत हे काम पूर्ण करण्यात आले आहे. या कामासाठी अंदाजे २७ कोटी रुपये इतका खर्च आला आहे. कालिदास नाटय़गृहाचे मजबुतीकरण (नाटय़गृह व प्रशासकीय इमारत) करण्यात येऊन नाटय़गृहाचे बदललेले छत हे (उष्णतारोधक व ध्वनिरोधक) पध्दतीने तयार करण्यात आले आहे.
महापालिकेच्या मुलुंड येथील कालिदास नाट्यगृह, तरण तलाव तसेच अंधेरीतील राजे शहाजी क्रीडा संकुलाचा कारभार ललित कला व क्रीडा मंडळाच्या माध्यमातून बघितला जातो. या दोन्ही ठिकाणी खेळापेक्षा व्यापार करण्यावर भर दिला जात असल्याने संस्थेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार भाजपाकडून पालिका आयुक्तांना केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी मंडळाचा कारभार पाहणारे शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. नुकताच जीएसटीच्या नुकसान भरपाईचा चेक पालिकेला देण्यासाठी उद्धव ठाकरे व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार एकत्र आले असताना सेना, भाजपाच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. इतकेच नव्हेत तर शिवसेनेच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांनी भाजपाचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांना मारहाणही केली होती. यामुळे मंगळवारी होणाऱ्या कालिदास नाट्यगृहाच्या लोकार्पण कार्यक्रमामध्येही राजकीय नाट्यमय प्रयोग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.