छापील किमतीपेक्षा जास्त जीएसटी दर आकारणाऱ्यांविरुद्ध तक्रार करा - गिरीश बापट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 July 2017

छापील किमतीपेक्षा जास्त जीएसटी दर आकारणाऱ्यांविरुद्ध तक्रार करा - गिरीश बापट


मुंबई, दि. ३ : केंद्र सरकारने १ जुलैपासून देशात एक वस्तू व एक कर यानुसार वस्तू व सेवा कर (जीएसटी) ही कर प्रणाली ग्राहकांच्या फायद्यासाठी आणली आहे. छापील किमतीमध्ये सर्व कर अंतर्भूत असतात. मात्र, जीएसटीच्या नावाखाली छापील किंमतीपेक्षा अधिक दर आकारून फसवणूक करण्याचा प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. असा प्रकार करणाऱ्यांविरुद्ध ग्राहकांनी वैधमापन विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी केले आहे.

बापट यांनी सांगितले की, पूर्वी असलेला उत्पादन शुल्क, विक्री कर यासह आकारण्यात येणाऱ्या इतर सर्व करांचे एकत्रीकरण जीएसटीमध्ये करण्यात आले आहे. जीएसटीमुळे ग्राहकांचा फायदा होणार असून यामुळे महागाई वाढणार नसून उलट वस्तूंच्या किंमती कमी होणार आहेत. त्यासाठी उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी कराच्या परताव्यात मिळणारा लाभ हा ग्राहकांपर्यंत पोहचविला पाहिजे. तसेच नफेखोरी रोखण्यासाठी कायद्यात तरतूद आहे. या कराची अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी सर्वसामान्य ग्राहकांनीही अधिक सतर्कता दाखवली पाहिजे. काही दुकानदार व व्यापारी जीएसटीच्या नावाखाली ग्राहकांकडून छापील किंमतीपेक्षा अधिक किंमत आकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत. असे करणे बेकायदेशीर असून ग्राहकांनी सजग रहावे.

ग्राहकांकडून छापील किंमतीपेक्षा अधिक दर घेऊन फसवणूक करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याची वैधमापन विभागाकडे तत्काळ तक्रार करावी. ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी वैध मापन यंत्रणा सतर्क आहे. यासाठी ग्राहकांनी Legal Metrology Maharashtra Consumer Grievances या फेसबुक पेजवर, ९८६९६९१६६६ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर अथवा वैधमापन विभागाच्या dclmm_complaints@yahoo.com या ई मेल आयडीवर अथवा ०२२-२२६२२०२२ या हेल्पलाईन नंबरवर फोन करून आपली तक्रार नोंदवावी अथवा आपल्या जिल्ह्यातील वैधमापन अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन मंत्री गिरीष बापट आणि वैध मापन शास्त्र यंत्रणेचे नियंत्रक तथा विशेष पोलीस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.

Post Bottom Ad