मुंबई - जीएसटी (वस्तू व सेवा कर) लागू झाल्यामुळे जकातीच्या नुकसान भरपाईचा पहिला हप्ता राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बुधवारी महापालिकेला सुपूर्द करणार आहेत. बुधवारी 700 कोटी रुपयांचा धनादेश स्वत: मुनगंटीवार मुंबई महापालिका मुख्यालयात येवून महापौरांकडे सुपूर्द करणार आहेत. यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरेही उपस्थित राहाण्याची शक्यता वर्तवली आहे. या निमित्ताने भाजपकडून शक्तीप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे.
जीएसटीमुळे पालिकेची जकात रद्द झाली आहे. जकातीतून महापालिकेला सर्वाधिक महसुल मिळत होता. दरवर्षी सात हजार कोटीहून अधिक उत्पन्न जकातीतून मिळत होते. त्यात दरवर्षी पाच ते आठ टक्यांची वाढ होत होती. त्यामुळे जकात बंद झाल्यावर पालिकेला कायमस्वरुपी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र ही भरपाई वेळेत होईल का, अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र जकात बंद झाल्यानंतर काही दिवसांतच पालिकेचा नुकसान भरपाईचा पहिला हप्ता बुधवारी सुपूर्द करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेतील भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी दिली. या निमित्ताने भाजपने चांगलेच शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरु केली आहे. जीएसटीवरुन शिवसेनेने भाजपला लक्ष केले आहे. मात्र, पालिकेला महिना संपण्यापूर्वीच नुकसान भरपाई देवून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाण्याची चर्चा आहे.
जकात रद्द झाल्यामुळे प्रशासन विविध कर वाढविण्याचे प्रस्ताव भविष्यात मांडण्याची शक्यता आहे.त्याला शिवसेनेकडून पाठींबा मिळवण्यासाठी 500 चौरस फुटा पर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सूट देण्यात येणार आहे. मात्र,आता राज्य सरकारकडून नियमित नुकसान भरपाई मिळत असल्याने करवाढीची गरज नसल्याची सबब पुढे करुन भाजपकडून शिवसेनेला खिंडीत पकडण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.