मुंबई / प्रतिनिधी - केंद्रात भाजपचे सरकार आल्यावर गोमाता आणि गोशाळा हा विषय सातत्याने गाजत आहे. मुंबईतही दहा हजार चौरस मीटर क्षेत्रफळ जागेवर गोशाळा निर्माण कराव्यात असा प्रस्ताव भाजपकडून महापालिका सभेत मांडण्यात आला होता. मात्र मुंबईच्या विकास आराखड्यात गोशाळा मुंबई शहरात नव्हे तर मुंबईबाहेरच सुरू कराव्यात असे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. या विषयावर नियोजन समितीमध्ये चर्चा होऊनही प्रत्यक्ष विकास आराखड्यात मात्र शिफारस करण्यात आलेली नाही. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गोशाळाना परवानगी नसल्याने राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
केंद्रात भाजपा सरकार सत्तेवर आल्यावर गो हत्या बंदी कायदा लागू करण्यात आला असून हा गुन्हा करणार्यांस दंड व कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गोपालनास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने गोशाळा सुरू करण्याव्यात अशी ठरावाची सूचना भाजपचे नगरसेवक डॉ. राम बारोट यांनी मांडली होती. मात्र मुंबईच्या मे २०१६ मध्ये पुर्नप्रसिद्ध झालेल्या प्रारूप विकास आराखडा २०३४ मध्ये झालेल्या गोशाळेच्या उद्दिष्टासाठी कोणतेही आरक्षण ठेवलेले नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या ‘आवश्यक आणि अनिवार्य’ करण्यात आलेल्या कर्त्यव्यांनुसार गोशाळा, कोंडवाडे, गुरांच्या गोठ्यांचे निर्माण व संरक्षण करणे महापालिकेचे बंधनकारक कर्तव्य नाही. राज्य शासनाने जुलै २००६ मध्ये अधिसूचना काढून गुरांचे गोठे, कोंडवाडे मुंबईबाहेर स्थलांतरित करावे अशी अधिसूचना काढली आहे. या विषयावर नियोजन समितीत चर्चा करण्यात आली, मात्र नियोजन समितीने कोणतीही शिफारस केलेली नाही असे या प्रस्तावाला उत्तर देताना पालिकेने कळविले आहे.